चंद्र ( Moon ) हा कुंडलीतला महत्वाचा ग्रह आहे, चंद्राला कुंडलीचा आत्मा मानला जातो. मन, गोरा रंग, आई, चांदी, मोती, द्रव पदार्थ,दूध फळे, वनस्पती, जलाशय, सागर, पांढऱ्या रंगाच्या वस्तू यांचा कारक आहे. तसेच शांतीचे प्रतीक असलेली पांढरी कबुतरं आणि पांढरी वस्त्र हे सुद्धा चंद्राशी संबंधीत आहे.ज्या स्त्रीयांना भाऊ नाही त्या स्त्रीया चंद्राला भाऊ मानून ओवाळतात म्हणून आपण चंद्राला मामा म्हणतो.
इतर ग्रहांचे प्रभाव जसे मानवी जीवनावर पडतात तसा चंद्राचाही प्रभाव पडतो. चंद्र आणि सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर आपल्याला जास्त दृश्य स्वरूपात दिसतो.अमावास्या आणि पौर्णिमेला चंद्रामुळे पृथ्वीवर समुद्राला भरती आणि ओहोटी येतात. तसेच चंद्राचा प्रभाव मानवी जीवनावरही पडतो म्हणून कुंडलीतल्या बिघडलेल्या चंद्रामुळे काही लोकं अतिचंचल वेडे, मतिमंद होतात किंवा वेडाचे झटके तरी येतात. मृतात्म्यांची शक्तिही या काळात अनेक पटीने वाढते म्हणून काही लोकांना भुताटकी, अंगात येणे, वेगवेगळे भास होणे, असे प्रकार अमावस्या, पौर्णिमेला घडतात.
चंद्र हा पाणी आणि वनस्पतींचा कारक असल्यामुळे नद्या, समुद्र, सरोवर, बागायती शेती यांवर तो आपला प्रभाव दाखवतो, अशा ठिकाणी मानवी जीवनाची भरभराट झालेली दिसते. जगातील अनेक शहरे ही सागरकिनारी वसलेली आहेत. मुंबई, दुबई, सिंगापूर, सिडनी, टोकीयो, न्यूयॉर्क, शिकागो ही त्याची काही उदाहरणं आहेत. सिंधू, गंगा, नाईल या नद्यांच्या किनारी मानवी वसाहती अति पुरातन काळापासून आहेत.ज्या भागात जास्त धरणे, सिंचन व्यवस्था, पाटबंधारे आहे तेथे मानवी जीवनमान उंचावलेले दिसते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात बागायती शेती आणि पाणी यांमुळे ग्रामीण भाग भरभराटीस आला आहे. पंजाब हेही त्याचेच एक उदाहरण आहे.
जगात कोठेही जा पाण्याजवळील Waterfront, Waterview असलेली घरं, आणि हॉटेल्स महागडी असतात. मुंबईतील मरिन ड्राईव्ह, मलबार हिल, वाळकेश्वर यापैकीच आहेत. अशा ठिकाणी राहण्यासाठी लोकं जास्त खर्च करायला तयार असतात, भले त्या पाण्याचा, वनस्पतींचा तेथील घरांसाठी काहीही उपयोग नसू देत पण मानवाला तेथे वस्ती करायला आवडते, हे सगळे प्रदेश चंद्राच्या अंमलाखाली येतात. बर्फ हा सुद्धा चंद्राचा कारक मानला जातो, म्हणूनच बर्फ वृष्टी होणाऱ्या प्रदेशात मानव जास्त समाधानी राहतो. उदा हिमालयाचा पट्टा, नेपाळ तिबेट, भूतान, यूरोप, न्यूझीलंड इ. चंद्राची दिशा पश्चिम असल्यामुळे पश्चिमेकडील बर्फ पडणारे देश अधिक समृद्ध आहेत. तसेच वाळवंटात किंवा पाण्याचा तुटवडा असलेल्या भागात राहणारा मानव सतत तणावग्रस्त आणि परिस्थितीशी झगडताना दिसतो उदा.अरबी देश, राजस्थाचे वाळवंट, आफ्रिका खंडातील काही देश.
जसे चंद्राला पाहून मनाला एक समाधान आणि शांतता लाभते. तसेच सरोवर, नदी, समुद्र आणि जंगल पाहून किंवा त्यांच्या सानिध्यात मनाला शांतता लाभते आणि मन (चंद्र ) सुखी तर माणूस सुखी. कोकणात समुद्र आणि मुबलक प्रमाणात झाडी, फळे असल्यामुळे अनेक सोयी, सुविधा नसतानाही महाराष्ष्ट्राच्या इतर भागापेक्षा कोकणी माणूस सुखी आणि समाधानी दिसतो. तेथील नारळ, खोबरे, फणस, काजू, भात, मिठागरे, हे पांढरा रंग आणि चंद्राचे नाते दर्शवितात केरळलाही असेच वातावरण आहे केरळला तर देवभूमी म्हणतात.
थोडक्यात काय तर आपल्या घरामध्ये, घरापुढे, परसबागेत, गच्चीवर झाडे, कारंजे, छोटे धबधबे ठेवा, सुख, शान्ति आणि भरपूर ऑक्सिजन तुम्हांला लाभेल. त्या वस्तूंची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. अशा घरांमध्ये जाऊन पहा किती प्रसन्न वाटते. प्रसन्न मन भरभराट आणि प्रगतीसाठी पोषक असतें. म्हणूनच म्हटले जाते मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.