बाईपण भारीच भावा | Baipan bharich bhava

2023 मध्ये बाईपण भारी देवा ( Baipan bhari deva ) हा एक मराठी चित्रपट येऊन गेला. समस्त महिला वर्गानी तर हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आणि बघता बघता सुपरहिट झाला. विशेषतः त्यातले टायटल सॉंग सगळ्यांनाच आवडले आणि ते खरोखर ठेका धरायला लावणारे होते. कथानकातील सहा बहिनीपैकी प्रत्येक स्त्री ही वेगळी होती, प्रत्येकीचा स्वभाव, आवडीनिवडी, आणि कौटुंबिक व दैनंदिन आयुष्यही वेगळे होते. असे वाटत होते की त्यातली प्रत्येक बहीण जणू काय समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करत होती. चित्रपटाची story जरी एवढी दमदार वाटली नाही पण त्यातले प्रत्येक पात्र किंवा प्रसंग कोणाच्या ना कोणाच्या आयुष्याशी जवळीक साधणारे होते त्यामुळे प्रेक्षकांना म्हणजेच खास करून बायकांना हा चित्रपट खूपच आवडला.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरातण काळापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. देवी, शक्ती, माता अशा अनेक रूपाने पूजलेही जाते पण व्यवहारिक दृष्ट्या पुरुषप्रधान संस्कृतीत मात्र स्त्री ही दुय्यमच ठरली जाते. पुरषाने चरितार्थ चालविण्यासाठी पैसा कमावणे आणि स्त्री ने घर संभाळने ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. शेवटी, पैसा हा महत्वाचा घटक मानला गेल्यामुळे तो कमावणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्व प्राप्त झाले, मग त्या व्यक्तीच्या शब्दाला, निर्णयाला आपोआप मान्यता मिळत गेली आणि घरी राहणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या व्यक्तीला दुय्यम समजले गेले.

घरी राहणारी स्त्री घरात कितीही राबत असली तरी तिचे काम हे एवढे महत्वाचे मानले जात नाही कारण त्यातून उत्पादकता दिसून येत नाही. तिच्या घरकामामुळे पैसा मिळत नाही त्यामुळे तीचा जॉब हा Thankless मानला जातो. मग ती आपली आई, आज्जी, बायको, बहीण कोणीही असू शकते. त्यांच्या कष्टाची किंमत जो पर्यंत केली जात नाही जो पर्यंत आपल्याला त्या सेवेसाठी किंमत मोजावी लागत नाही किंवा स्वतःला ते करण्याची वेळ येत नाही . त्या भूमिकेत गेल्याशिवाय तिथला त्रास कोणाला कळत नाही. घरातली साफसफाई, भांडी, स्वयंपाक, भाजीपाला, किराणा यांचे नियोजन, कपडे, घरातल्या लोकांचे आजारपण, मुलांचा अभ्यास, त्यांचा टिफिन आणि शाळेसंबंधीत सगळ्या गोष्टी. घरात कोणी वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची देखभाल. अशी कित्येक कामे की ज्यांची यादी वाढतच जाईल. एवढे करून अजून घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणी मूड सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. हे सगळे करून परत त्या स्त्रीला ऐकायला मिळते दिवसभर घरीच तर असतेस…मग तेवढे पण करायला नको का..? ‘आई कुठे काय करते ‘ ही मालिका काही दिवसांपूर्वी आली होती ती या विषयाला धरूनच काढली असावी….

दररोज कोणती भाजी करायची? त्याला लागणाऱ्या साहित्याचे नियोजन कसे करायचे हे सुद्धा एक टेन्शनच असते. बरं सगळे करून जर कोणी जेवणाला नावे ठेवली की मग वाईट वाटते आणि त्या केलेल्या कष्टाची किंमत शून्य होऊन जाते. बोलणारा सहज बोलून जातो की भाजी चांगली झाली नाही वगैरे वगैरे पण त्यामागे किती श्रम असतात हे त्या व्यक्तीला माहित नसते. साधा चहा नास्ता बनवायचा म्हटलं तर किती भांडी किचमध्ये साचत असतात मग दिवसाभरात 2 वेळा स्वयंपाक, चहा पाणी यांची कितीतरी भांडी पडत असतील शिवाय यांसाठी तासंतास किचनमध्ये उभे राहवे लागते. धूर, वाफ, मसाल्याचा ठसका, कांद्यामुळे होणारी डोळ्यांची आग, कापणे, भाजणे या गोष्टींचाही सामना करावा लागतो. आम्ही बॅचलर असताना वरील बऱ्याच गोष्टी अनुभवास यायच्या. तेव्हा कळले हे सगळे दिसते तेवढे सोपे नाही. खरोखर, जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे.

बायको जेव्हा माहेरी जाते किंवा आजारी पडते तेव्हा पुरुषांना तीची खरी किंमत कळते. स्वतः स्वयंपाक करताना काय धांदल उडते ते त्यांनाच माहीत. कोणत्या वस्तू कोणत्या डब्यात ठेवल्यात ते सापडता सापडत नाही. वॉशिंग मशीनला कपडे कशी लावायची? किती लिक्विड टाकायचं, काय सेटींग लावायचं हे सुचत नाही. घरात जर डिश वॉशर असेल तर त्यांच सेटींग काय आहे ते कळत नाही. आपलीच कपडे कधी कधी ती कुठे ठेवली आहेत हे आपल्याला सापडत नाही. मग काही झाले की विचारा बायकोला. हे कसं करू ते कसं करू, हे कोठे आहे, ते कोठे ठेवले वैगरे वैगरे. बाहेरगावी शिकायला असताना मला कपडे स्वतः धुवावी लागत असत.. कितीही साबण लावला आणि हाताने जोर लावला तरी ती म्हणावी तितकी चांगली निघत नसत पण मी जेव्हा सुट्टीला घरी जायचो तेव्हा आई किंवा आज्जी कपडे घुवायची. त्यांनी धुतलेली कपडे अगदी स्वच्छ आणि पांढरी सफेत निघत असत. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना हे कसं काय शक्य होतं? शेवटी समजून गेलो की स्त्री चा हात लागल्याशिवाय खरोखर कपडे चांगली धूतली जात नाही. येथे पाहिजे जातींचे ही म्हण त्यांना खरोखर चपलख लागू पडते.

काही वर्षांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जाण्याचा योग आला होता. सर्वसाधारण वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. नोकरी करणारा माणूस, घरात शाळेत जाणारी दोन मुलं अस काहीसं चित्र होतं. घरात गेल्यावर एक प्रकारची उदासीनता जाणवत होती. घरातील भिंती, पडदे, उशा, बेडशीट मळालेले दिसत होते. वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. काही ठिकाणी घुळ जमा झालेली दिसत होती. एकंदर त्या घरात त्या स्त्रीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. घरात स्त्री चा हात फिरल्याशिवाय त्या घराला घरपण येत नाही हे तेव्हा कळून चुकले . जर ती स्त्री त्या घरात असती तर चित्र खूप वेगळे असते. सगळं कसं टापटीप पहायला मिळालं असत. कमीतकमी, मुलं आणि पतीचा चेहरा तरी खिन्न दिसला नसता. आलेल्या पाहुण्यांना चहा तर नक्कीच मिळाला असता. पतीचे निधन झाले तरी स्त्री कसेही करून मुलांचा सांभाळ करून कुटुंब एकजीव ठेवते आणि मुलांना उभारी देते पण पत्नीच्या निधनाने पुरुषांना हे सगळं शक्य होत नाही. तेथे बरेच पुरुष अपयशी होताना दिसतात.

आई वडिलांकडची सुरवातीची वीस पंचवीस वर्ष सोडली तर उर्वरित आयुष्य त्या स्त्रीला परक्या घरीच घालवावी लागतात. प्रत्येक मुलीसाठी हा एक आयुष्याचा जुगारच असतो. जीवनसाथी, सासरची मंडळी, चांगली असतील तर ठीक नाहीतर आयुष्य बरबाद होते. नाही म्हटले तरी हा एक वन वे च (one way )असतो परत मागे फिरता येत आणि फिरलेच तर त्या परतण्याला काही किंमत उरत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत पुनर्जन्म या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो. अध्यात्मामध्ये उच्च कोटीला पोहचलेले महात्मे लवकर मुक्ती मिळावी म्हणून पुढचा जन्म स्त्रीचा घेतात. कारण स्त्री जन्माने अध्यात्मिक प्रगती लवकर होते आणि लवकर मुक्ती मिळून जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळते अशी त्यांची मान्यता आहे. स्त्री जन्मात लग्नानंतर तिला आई वडील सोडून उरलेले आयुष्य पतीच्या घरी काढावे लागते या त्यागातच तिची महानता आहे. सासरकडे तिला सासू, सासरे,मुलं पती, आणि कुटुंबातील इतर लोकांची आजारपणात किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा करावी लागते त्यामुळे सेवेचे पुण्य तिला आपसूकच लाभते. स्त्री ही अन्नपूर्णा आहे. दररोज अन्न तयार करून ती कुटुंबातील सगळ्या सदस्यांना जेऊ घालत असते त्यामुळे अन्नदानाचे पुण्य तिला भेटते.

नऊ महिने उदरात वाढवून, प्रसूती कळा सोसून ती मुलांना जन्म देते, एवढेच नाही तर मुलांचा मोठे होई पर्यंत संभाळ करते. दरम्यानच्या काळात मुलांची कितीतरी सेवा तिच्याकडून होते. मुलांची ती इतकी काळजी घेते जणू काय मुलांसाठी तीच श्वास घेते की काय असे वाटते. अध्यात्मिक जगात या सेवेची कोठे ना कोठे तरी नोंद ठेवली जाते. पतीचे आजारपण कितीही त्रासदायक आणि वाईट असले तरी हे सगळं करायला एक वेळेस मुलं किंवा इतर नातेवाईक पाठ फिरवतील पण आई किंवा पत्नी मात्र शेवटच्या क्षणापर्यत सेवा करतील. ही सेवा त्यांच्या पुण्याईत भर पाडीत असते आणि म्हणूनच अध्यात्मिक जगतात लवकर मुक्ती मिळविण्यासाठी अनेक महात्मे, साधू, संत पुढील जन्म स्त्रीचा मागून घेतात आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली कायमची सुटका करून घेतात. आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये स्त्री जन्म महान मानला आहे. जगातल्या सगळ्या जाती धर्मात त्यामुळेच आईला अनन्यसाधारण महत्व आहे आणि पत्नीला अर्धांगिनी म्हणजेच Better Half म्हटले आहे. त्यामुळेच समस्त पुरुष मंडळींनी खरोखर म्हणायला पाहिजे बाई पण भारीच भावा.….