साडेसाती म्हणजे काय | What is Sadesati

साडेसाती (Sadesathi ) हा काय प्रकार आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते तर त्याबद्दल या लेखात आपण माहिती जाणून घेऊया. अंतराळातील प्रत्येक ग्रह गोलाचा पृथ्वीवर आणि तेथील जीवसृष्टीवर परिणाम होत असतो. जसे की सूर्यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश मिळतो, वनस्पतींच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो, कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात D जीवनसत्व निर्माण होण्यास मदत होते आणि अती प्रखर सूर्यकिरणांमुळे Sunburn किंवा स्कीन कॅन्सर होतो तसेच चंद्रामुळे सागराला भरती आणि ओहोटी येतात. चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला आहे त्यामुळे अमावस्या, पौर्णिमेच्या काळात चंद्राचा प्रभाव जास्त असल्यामुळे काहींना वेडाचे झटके येतात किंवा विचित्र वागतात.

लाखो किलोमीटर दूर असूनही त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींमुनींनी दुर्बीण किंवा कसलेही आधुनिक उपकरण नसताना गुरु, शुक्र शनी, बुध, मंगळ अशा ग्रहांचा शोध लावला आणि त्याचबरोबर राशीही शोधून काढल्या. शनी आणि गुरु हे मोठे ग्रह आपल्या डोळ्याने दिसत नाही पण त्यांनी त्यांचे वर्णन अचूक करून ठेवले आहे. एवढेच नाही तर या ग्रहांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो हे सुद्धा त्यांनी संशोधन करून त्यावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. शनी हा अतिशय मंद गतीने फिरणार ग्रह आहे. आकाशात फिरताना तो एका राशी समोरून अडीच वर्षे जात असतो. म्हणजे त्याला पूर्ण फेरी मारण्यासाठी 12 राशींसमोरून जावे लागते , एक फेरी पूर्ण होण्यासाठी 29-30 वर्ष लागतात.

शनी जेव्हा एखाद्या राशीच्या समोरून अडीच वर्ष जात असतो तेव्हा त्या काल खंडात जन्मलेल्या प्राणीमात्रावर त्याचा परिणाम करत असतो. हे न दिसणाऱ्या ग्रहांचे संशोधन आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी झाले होते. हे ज्ञान सर्व सामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे होते आणि त्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता त्यामुळे त्याला धार्मिक जोड देऊन ते वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहचवले गेले आहे. या ग्रहांवरील संशोधन अमेरिका आणि यूरोप मध्ये अलीकडच्या काळात म्हणजे 100-150 वर्षांपूर्वी झाले आहे.

साडेसाती हा शनी (shani) ग्रहाच्या संबंधित विषय आहे आणि त्याचा आपल्याकडे खूपच बोलबाला असतो. साडेसाती आली की प्रत्येकजण घाबरतो आणि साडेसाती ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. आपल्या आयुष्यात साडेसातीचा सामना दोनदा किंवा तीनदा करावाच लागतो. शनी आकाशात फिरताना जेव्हा एखाद्या राशीत प्रवेश करतो म्हणजे तेथून तो मार्गक्रमण करत असतो तेव्हा त्या राशीला साडेसाती लागली असे म्हणतात म्हणजेच शनीचा प्रभाव तिथे दिसायला सुरवात होते.

शनीचे भ्रमण प्रत्येक राशीत अडीच वर्षे असतें. आपल्या आधीच्या राशीत शनी अडीच वर्ष असतो तेव्हाही त्रास होतो त्यानंतर आपल्या राशीत अडीच वर्ष असतो तेव्हाही त्रास होतो आणि आपल्या राशीतून पुढच्या राशीत अडीच वर्ष असतो तेव्हाही आपल्याला त्रास होतो. अशा प्रकारे साडेसात वर्ष हा त्रास असतो. जसे एखाद्या गृहस्थाच्या राहत्या घराच्या डाव्या आणि उजव्या बाजूंच्या घरांमध्ये खूप त्रासदायक,भांडखोर, शेजारी राहात असतील तर त्याला त्यांचा त्रास सहन करावा लागतो आणि स्वतःच्या घरातच जर अशी एखादी व्यक्ती राहत असेल तर अजूनच त्रास होतो. शनीचेही अगदी तसेच असते. शेजारच्या राशीत असला तरी त्रास आणि स्वतःच्या राशीत असला तर अजून जास्तच त्रास होतो.

साडेसातीचा त्रास हा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे अनुभवायला मिळतो. तें सर्वस्वी आपल्या पूर्वकर्मावर आणि सध्याच्या कर्मावर अवलंबून असतें. या साडेसाती काळात आर्थिक नुकसान होऊन कर्ज होते, नोकरीधंद्यात अडचणी वाढतात , काहींच्या नोकर्‍या जातात, धंदे बंद पडतात, फसवणूक, कोर्टकचेऱ्या घटस्फ़ोट होतात , खोटे आळ किंवा आरोप होतात , आजारपण वाढते, अपघात होतात, कुटुंब कलह वाढतो, अपमान सहन करावा लागतो, तुरुंगवास भोगावा लागतो , जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे. असे अनेक प्रकार चे त्रास साडेसातीमध्ये होतात.

या काळात जातक अगदी त्रासून जातो. जितक्या उड्या मारील तितके तो अजून खोलात जातो. इतर वेळेस हुशार, अनुभवी आणि चतुर समजली जाणारी माणसं अगदी मूर्खात निघतात. कधी कधी असे वाटते,यांनी स्वतःची बुद्धी गहाण ठेवली की काय? सगळ्या बाजूने हताश होतात आणि नैराश्य येते. साडेसाती मध्ये आईलाही त्रास होतो. कधी आजारपण येते तर कधी मृत्यू होऊ शकतो. याच काळात नोकरीत बदली झाल्यामुळे कुटुंबापासून दूर राहण्याचा योग येतो. काहींना मातृभूमी सोडून दूर च्या शहरात किंवा परदेशात नोकरीसाठी जावे लागते. अशा वेळेस केलेले स्थलांतर खूप त्रासदायक ठरते. नोकरीसाठी वणवण भटकावे लागते, राहण्याची सोय लवकर होत नाही. अपमान सहन करावा लागतो. पैशाची चणचण भासते, अशा अनेक गोष्टी घडतात.

साडेसाती आली म्हणजे वाईट कर्म किंवा प्रारब्ध भोगण्याची वेळ आली असेच आपण समजावे आणि हे काम शनीकडे सोपविलेले आहे. शनी ही न्याय देवता आहे, येथे कोणालाही माफ केले जात नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माची सजा भोगावीच लागते त्यामुळे शनी वाईट आहे हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे आपण वाईट वागलेलो असतो म्हणून हा त्रास असतो. शनी फक्त न्यायाधीशाचे काम करतो दैनंदिन जीवनामध्ये वशिला, लाचलुचपत, यामुळे एखाद्याची गुन्ह्यातून सुटका होऊ शकते पण शनीच्या दरबारात चुकीला माफी नाही, येथे शिक्षा भोगावीच लागते.

साडेसातीच्या काळात माणुस वैतागून जातो मग तो देवधर्म, जोतिषी, उपासना, उपास-तापास, नवस यांच्या पाठीमागे लागतो. साडेसातीच्या उच्च काळात केलेल्या उपासना, देवधर्म शक्यतो फळाला येत नाही, कधी कधी त्यावर विश्वासच बसत नाही, उपासनेत अनेक अडचणी येतात किंवा काहीच फरक जाणवत नाही.. कारण भोग हे भोगूनच संपवावे लागतात. याला संत महात्मे ही अपवाद ठरलेले नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामीं रामकृष्ण परमहंस, स्वामी वासुदेवानंद सरस्वती, राम लक्ष्मण या सर्वांच्या आयुष्यात खूप काही त्रास होते. आपल्या सिद्धीच्या आणि शक्ती च्या जोरावर ते या गोष्टींवर मात करू शकले असते पण त्यांनी ते निमूटपणे सहन केले कारण मानव जन्मात भोग हे भोगूनच संपवावे लागतात.

साडेसाती चालू असताना काही लोकांच्या उपासनेला यश मिळते कारण त्यांचे प्रारब्ध एवढे वाईट नसते किंवा साडेसाती संपत आलेली असतें. ज्यांचे प्रारब्ध अति दूषित असते त्यांना मात्र काही केल्या फरक जाणवणार नाही, त्यांना शिक्षा ही भोगावीच लागते. या काळात माणूस अतिशय त्रासलेला असतो, सततच्या अपयशामुळे तो पूर्णपणे खचलेला असतो, त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे नकारात्मक बनलेला असतो. काहींचा देवधर्मा वरील विश्वासही उडतो. अशा वेळेस जवळच्या नातेवाईकांनी ( आई, वडील, बहीण,भाऊ मुलगा, मुलगी, पत्नी ) यापैकी कोणीतरी जर त्या व्यक्ती साठी संकल्प सोडून काही उपासना केली तर फळ मिळू शकते.


साडेसातीचा जसा त्रास होतो तसें काही फायदेही असतात. गर्वाचे घर खाली होतें, ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांचे पाय जमिनीला टेकतात, भ्रष्टाचारी लोकांचे भ्रष्टाचार उघडकीस येतात, कधी हाती न लागलेले अट्टल गुन्हेगार पकडले जातात. अडचणीच्या काळात आपले कोण आणि परके कोण हे कळते, माणसांचे खरे स्वभाव कळतात, पैशाची खरी किंमत कळते आणि उधळपट्टीला चाप बसतो. अनेक धक्के खाल्ल्यामुळे शहाणपण येते आणि समजूतदारपणा वाढतो.

साडेसातीत मातृभूमी सोडणाऱ्यांचा नंतर भाग्योदय होतो. देवधर्मावर विश्वास वाढतो, जीवनाचा खरा अर्थ कळायला लागतो. या काळात फक्त टिकून राहणे यातच शहाणपण असते. परिस्थिती पासून पळून जाण्यात काहीच अर्थ नसतो. Wait and watch हेच तत्व अवलंबणे योग्य असते. हे एक कालचक्र असते, वाईटानंतर चांगले दिवस येत असतात जसे की अंधारानंतर प्रकाश येत असतो. साडेसाती नंतर अनेकांचे भाग्योदय झालेले दिसतात… अशी ही साडेसाती प्रत्येकाला अनुभवायला मिळतेच.