आम्ही शाळेत असताना गावाकडे हॉटेल मध्ये फक्त मिसळ, भजी आणि भेळ हेच खाद्य पदार्थ मिळायचे. वडापाव ( Vadapav ) हा प्रकार कधी ऐकला पण नव्हता आणि खाल्ला पण नव्हता. एकदा वडिलांबरोबर गावाला जात असताना आम्हाला शिरूरमध्ये एक ओळखीचा पाहुणा भेटला. चहा पिण्यासाठी त्यांनी आम्हाला हॉटेल मध्ये नेले. पाहुण्यांनी मला विचारले तू काय खाणार, मी आपलं सहजच नको म्हणालो. मग ते म्हणाले वडा खाणार का? वडा म्हटल्यावर मला वाटले आपण घरी मटकीच्या डाळीपासून बनवतो ते वडे (सांडगे ) असतील. मनात म्हटलं वड्याची तर घरी भाजी करतात मग ते हॉटेल मध्ये खाण्यात काय मजा? मग ते म्हणाले मिसळ सांगू का? मग मी हो म्हटल्यावर त्यांनी माझ्यासाठी मिसळ मागवली. त्यानंतर बरीच वर्ष मला वडे (सांडगे ) हॉटेल मध्ये का देतात हे समजले नव्हते.
पुढील शिक्षणासाठी नगरला गेल्यावर पहिल्यांदा वडापाव खाल्ला तेव्हा मला कळले की हॉटेल मध्ये वडे मिळतात म्हणजे तो हा वडापाव असतो किंवा वडा सांबर तरी असतो. आपण समजतो ते वडे ( सांडगे ) नसतात. तेव्हा मला त्या पाहुण्याने हॉटेल मध्ये वडा खायचा का विचारल्याचा अर्थ समजला ? तेव्हा वडापाव कसा खातात हे सुद्धा माहिती नव्हते. आम्ही वडापाव खाताना पावाचा तुकडा तोडून वड्या बरोबर खायचो जसे आपण चपाती किंवा भाकरीबरोबर भाजी खातो.
नंतर मुंबईला गेल्यावर कंपनीत ट्रेनींगच्या पहिल्या दिवशी त्यांनी नाश्त्याला वडापाव आणि चहा ठेवला होता. मी आपलं नेहमीप्रमाणे वडापाव घेतला आणि पावाचा तुकडा तोडून वड्यासोबत खाऊ लागलो. शेजारी एक रत्नागीरीचा कोकणी मुलगा बसला होता, बहुतेक त्याला मुंबईची चांगली ओळख होती. तो पाव अर्धा करून त्यात वडा ठेऊन खाऊ लागला. मी थोडावेळ त्याच्याकडे पहिले. इकडे तिकडे नजर फिरवली आणि बऱ्यापैकी सगळे तसेच खाताना दिसले. मग मी पण त्यांचेच अनुकरण केले. पावामध्ये वडा टाकला खायला सुरवात केली आणि खऱ्या अर्थाने मी तेव्हा वडापाव खायला शिकलो.
आता वडापाव ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे. खेडोपाडी प्रत्येक हॉटेल मध्ये वडापाव मिळतो आणि शहरात तर लोकांचा आवडीचा पदार्थ झाला आहे. वडापाव न आवडणारी व्यक्ती शोधून पण सापडायची नाही. लहानापासून मोठयापर्यत आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंत वडापाव सगळ्यांना आवडतो. रस्त्यावरच्या हातगाडीपासून तर मोठया रेस्टॉरंट पर्यंत हा वडापाव मिळतो. एकदा विदर्भ भागात गेलो असता तिकडे अजूनही वडापाव सगळीकडे मिळत नाही. गोल वडा आणि सांबर भेटते आणि त्याबरोबर स्लाईस ब्रेड देतात, त्याला ते आलू गोंडा म्हणतात. तोआलू गोंडा खाताना असे वाटते, अरे यांना कोणीतरी वडापाव बनवायला शिकवा रे…..पण काय करणार दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. असे वाटले इथे जर कोणी वडापावचा व्यवसाय चालू केला तर निश्चित करोडपती होईल इतका वाव आहे कारण स्पर्धकच नाही . आजकाल लोकं घरी पण वडापाव करू लागलेत. घरचा वडापाव म्हणजे नास्ता नसून ते जेवणच होते कारण भरपूर पाहिजे तेवढा मनसोक्त वडापाव खाता येतो.
वडापावचा इतिहास पाहिला तर तो प्रथम मुंबईत दादर येथे सुरु झाला असे सांगण्यात येते. अशोक वैद्य या मराठी माणसाने 1960 मध्ये वडापावचा शोध लावला. हाच वडापाव हळू हळू महाराष्ट्रभर प्रत्येक, हॉटेल, रेस्टोरंट, आणि घराघरात पोहचला आहे. आज वडापाव भारतभर आणि परदेशातही मिळू लागला आहे. वडापाव ला बॉम्बे बर्गर म्हूणनही ओळखले जाते. वडापावच्या जीवावर अनेक लोकं करोडपती झाले, अनेक फ्रंचायजी उभ्या राहिल्या. वडापाव या विषयावर 2015 मध्ये एक लघुपटही बनवण्यात आला होता, तो अशोक वैद्य यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यानंतरही वडापाव या विषयावर काही शॉर्ट फिल्म आल्या. 23 ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिन म्हणून साजरा केला जातो.
मॅकडोनाल्डच्या बर्गरची ची चव जगात कोठेही गेले तरी सारखीच असते ती बदलत नाही कारण त्यांची प्रोसेस ठरवून दिल्याप्रमाणे सगळीकडे तशीच वापरली जाते. वडापाव चे मात्र तसें नाही. प्रत्येक ठिकाणचा वडापाव वेगळा असतो, चव, आकार आणि किंमतही वेगळी असते. एवढेच काय पण त्याबरोबर दिलेली चटणी पण वेगळी असते. शेंगदाणे चटणी, खोबरे चटणी, पुदिना चटणी, हिरवी मिरची, कांदा असे अनेक प्रकार पहायला मिळतात.
लोकांनी वडापावचे अजून काही प्रकार शोधून काढले आहेत. चिकन वडापाव, अंडा वडापाव, उलटा वडापाव, चीज वडापाव, जम्बो वडापाव, असे काही प्रकार आहेत. जे प्रसिद्ध वडापाववाले आहेत आणि त्यांच्याकडे खूप गर्दी असते त्यालाही कारण असते. त्यांची चव खरोखर चांगली असते. पुण्याचा जोशी वडापाव मी दोन तीन ठिकाणी खाऊन पाहिला पण चव सगळीकडे उत्तम होती. मुंबईला कर्जत रेल्वे स्टेशन ला मिळणारा दिवाडकर वडापाव छानच आहे. संगमनेरचा अन्सार चाचा वडेवाला तर महाराष्ट्रभर फेमस झाला आहे. ही लोकं चांगल्या प्रतीचा माल वापरतात. उत्तमप्रतीचे तेल, बटाटे, आणि खास करून त्यांचा सिक्रेट मासाला असतो. आजकाल बाजारात बेसनपीठ चांगले मिळत नाही म्हणून काहीजण डाळ दळून स्वतः बेसन तयार करतात त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते.
पूर्वी पुणे स्टेशनला 1 रुपयात वडापाव मिळत होता पण क्वालिटी अगदीच खालच्या दर्जाची असायची बटाटे हिरवे आणि कडक असत, ते पूर्ण शिजलेले नसायचे.एकदा खाल्ले तर परत कोणी जाईल का ही शंका होती. वडापाव हे गरिबांचे पोट भरण्याचे साधन आहे. हल्ली ते पण शक्य राहिले नाही कारण पावाचा आणि वड्याचा आकार दिवसेंदिवस लहान होत चालला आहे त्यामुळे दोन वडापाव खाल्ले तरी पोट भरेल का ही शंका आहे.
वडापावने आता सातासमुद्रापार यात्रा केली आहे. परदेशातही आता काही ठिकाणी ताजा वडापाव मिळू लागला आहे. परदेशातील भारतीय दुकानांमध्ये आता वडापाव चटणी, वडापाव पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत की जे भारतातून निर्यात झाले आहेत.
अमेरिकेतील एका विद्यापीठात हॅरिस सोलोमन हा विद्यार्थी वडापाव या विषयावर PhD करत आहे. मराठमोळ्या पदार्थाला मिळालेली ही प्रसिद्धी खरोखर आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.