सिडनी शहरापासून सर्वसाधरण 550 km अंतरावर हे शहर वसलेले आहे. विमान, रेल्वे, आणि हायवे या तिन्ही मार्गानी आपण तिथे पोहचू शकतो. एका बाजूला सुंदर अशा हिरव्यागार डोंगर रांगा आणि दुसऱ्या बाजूला निळाशार पसरलेला अथांग समुद्र आहे आणि या दोन्हीच्या मध्ये पॅसिफिक हायवेला लागून हे शहर पसरलेले आहे. तेथील उंच डोंगरावरच्या दोन लूक आऊट पॉइंट वरून या शहराचा खूप सुंदर नजारा पहायला मिळतो. Coffs harbour हे Gold coast आणि Sydney च्या मध्ये आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले हे एक मोठे शहर आहे.
Coffs harbour मध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्यापैकी Big banana fun park, The clog barn, Butterfly House , Botanical garden, Aquarium,, Mutton-bird island, Forest sky pier ( Look out ) Korora lookout, Jetty, इ आहेत. या शहराची अजून एक खासियत म्हणजे केळीच्या बागा. केळीच्या उत्पादनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे आणि बहुतेक करून पंजाबी लोकं ही शेती करतात. या शहराच्या आसपास डोंगर उतारावर या बागा पहायला मिळतात. बीग बनाना पार्क पासून थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वळ्ल्यावर Korora रोड ने पुढे जात राहिले की या केळीच्या बागा लागतात. उंच डॉगरावरून हे दृश्य छान दिसते तसेच Coramba road, Bennetts road या रस्त्याने गेल्यावरही छान बागा पहायला मिळतात.
Coffs Harbour पासून पुढे 25 km वर Woolgoolga हे एक गाव आहे, याला मिनी पंजाब म्हणून ओळखले जाते. येथे खुप सारे पंजाबी लोकं राहतात. त्यात शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा सगळ्या प्रकारची लोक आहेत. आपल्याला प्रश्न पडतो की ही एवढी सगळी लोकं इथे आली कशी? किंवा याच ठिकाणी ही एवढी कशी काय एकवटली असावीत ? हो, त्यालाही एक इतिहास आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांवर पूर्वी ब्रिटिशांचे राज्य होते.
ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजानी 1890 पासून पुढे उसाच्या शेतीसाठी ऊसतोड कामगार म्हणून पंजाब मधून या लोकांना ऑस्ट्रेलियातल्या Queensland आणि New South Wales या राज्यातल्या वेगवेगळ्या गावात आणले गेले. ऊस तोड हे सिजनल काम होते, ऊस तोडून गेल्यावर उरलेल्या दिवसात काही काम नसायचे, म्हणून मग कोणी ऑस्ट्रेलियन शेतकऱ्याने त्यांना केळीच्या शेतीत काम करण्यासाठी Woolgoolga या गावी आणले. केळीच्या शेतीत वर्षभर काम असल्यामुळे कालांतराने ते तिथेच स्थायीक झाले. पुढे अजून काही शीख लोक कामाच्या शोधात इकडे आले.
ऑस्ट्रेलियातील ही पंजाबी लोकं ब्रिटिश साम्राज्याचा भाग असल्यामुळे पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना ऑस्ट्रेलियात कायम राहण्याची परवानगी मिळाली आणि मतदान, पेन्शनच्या सुविधा, शिवाय पत्नी आणि मुलांना भारतातून इकडे आणण्याची परवानगीही मिळाली. सुरवातीला आलेली ही लोकं अशिक्षित किंवा फार कमी शिकलेली होती पण पोटापाण्याच्या शोधार्थ यांनी मायदेश सोडला आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले, कदाचित हे पंजाब मधील गरीब कुटुंबातील असावेत. सुरवातीला यांना इंग्रजी भाषा वैगरे येत नसे पण सरकारकडून त्यांना इंग्रजी बोलण्याचे शिक्षण दिले गेले.
वूलगूलगा मध्ये आल्यावर सुरवातीला ही लोकं मजूरी आणि नंतर भाडे तत्वावर शेती करू लागले. पुढे दोन चार जण एकत्र येऊन शेती विकत घेऊन करू लागले. कमी जमिनीत चांगले उत्पन्न, वर्षभर काम,कमी यंत्र सामुग्री यामुळे उसाच्या शेतीपेक्षा केळीची शेती त्यांना परवडत होती, शिवाय केळीला वर्षभर मागणी असते त्यामुळे हे पीक किफायतशीर होते. जसे जसे उत्पन्न वाढत गेले तसें ते अजून शेती घेत गेले. नवीन येणाऱ्या लोकांना बँक कर्जासाठी आणि इतर कामासाठी जुनी लोकं मदत करू लागली, त्यामुळे वूलगूलगा या गावात शिखांची संख्या वाढत गेली.
पुढे 1968 मध्ये तेथे पहिले शीख मंदिर उभारले गेले आणि त्यामुळे अजून पंजाबी कुटुंबे इकडे आकर्षित झाली. त्यानंतर अजून एक शीख गुरुद्वारा उभारले गेले.या ठिकाणी दररोज मोफत जेवण देऊन अन्नदानाचे पवित्र कार्य केले जाते त्याला ते लंगर म्हणतात. सगळ्या जाती धर्माचे भारतीय लोकं या गुरुदवाराला भेट देत असतात. तिथेच पुढे रस्त्याच्या पलीकडे एक वस्तुसंग्रहालय आहे, त्यामध्ये शीख धर्म, संस्कृती, ऑस्ट्रेलियातील शीख लोकांचा इतिहास या बद्दल आपल्याला माहिती मिळते.
आजच्या घडीला Coffs Harbour च्या परिसरात पाचशे ते सहाशे लहानमोठे पंजाबी शेतकरी आहेत. त्यात काही एकरांपासून ते 1000 एकरापर्यंत जमीन असलेले शेतकरी आहेत. ऑस्ट्रेलियात शेत मजूर मिळणे तशी अवघड गोष्ट आहे त्यामुळे यांत्रिक पद्धतीनेच शेती केलीं जाते, तरी पण केळी, आणि इतर छोटया फळांची शेती करण्यासाठी मजुरांची गरज भासतेच. शेतीला मजूर पूरवठा करणारे एजेंटही आहेत.विशेषता स्टुडन्ट विसा वर आलेले भारतीय विद्यार्थी , बॅकपॅकर्स, हॉलिडे विसा वर आलेले टुरिस्ट आणि आशिया खंडातील इतर देशातील अकुशल कामगार यांना मजूर म्हणून मिळतात. काही ठिकाणी यांची राहण्याची सोय बहुधा हे शेतकरीच करत असतात.
डोंगर उतारावर JCB ने खड्डे करून या केळीच्या बागा तयार केल्या जातात आणि त्या पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. मध्ये मध्ये सतत पाऊस होत राहिल्यामुळे बागेला पाण्याची कमतरता भासत नाही. अगदी फार थोडेच शेतकरीच केळीच्या शेतीला ठिबक सिंचन ने पाणी देतात. केळीची शेती तशी कष्टाची असल्यामुळे काही शेतकरी आता दुसऱ्या पिकांकडे वळले आहेत. ब्लू बेरी, काकडी, टोमॅटो, आले, व इतर काही भाजीपाला ते करत आहेत.
शेतीत पीक घेतल्यानंतर शेतकऱ्याला सर्वात मोठा प्रश्न असतो की याचे मार्केटींग कसे करायचे? हा प्रश्न येथील शेतकऱ्यांना ही आला असेलच. केळीच्या मालासाठी अजूनही एजेंट आहेत. ते सगळा माल खरेदी करतात आणि मोठया कंपनीला पुरवतात तेथून पुढे तो होलसेलर, सुपरमार्केटला वितरित होतो. इतर पिकांसाठी तेथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन को-ऑपरेटिव्ह कंपनी केलीआहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचे शेअर्स आहेत.
शेतकर्यानी आपला शेतीमाल फक्त या कंपनीत आणून द्यायचा. साफसफाई, प्रतवार, पॅकिंग, वितरण, आणि मार्केटींग सगळे कंपनी पाहते. त्यासाठी कंपनीत अनेक कामगार काम करतात.