कण कण में है भगवान | God is everywhere

भगवंत सगळीकडे आहे (God is everywhere ) असे आपण कायम ऐकत आलेलो आहे .सृष्टीतल्या प्रत्येक वस्तू आणि अणु रेणू मध्ये ईश्वर आहे अशी आपल्या हिंदू धर्माची मान्यता आहे. भक्त प्रल्हादाला तो सगळीकडे दिसत होता म्हणून त्याच्यासाठी तो खांबातून बाहेर आला हे आपण ऐकले आहे . जसा आपण विश्वास ठेवतो तसे आपल्याला पुरावे मिळतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. कणा कणात देव आहे अशी जर तुमची श्रद्धा असेल, तर देव तुम्हाला कोठेही दिसेल. मग तो दगडात, झाडात, प्राणीमात्रात आणि माणसात सुद्धा.

पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी समोरच्या प्रत्येक माणसात देव पाहतो, माऊली म्हणून हाक मारतो आणि त्याच्या पायाही पडतो. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीच्या लोकं पाया पडून जेवढी जमेल तेवढी सेवा करतात कारण त्यांच्या रूपात ते नर्मदा मैयाला पाहत असतात. अनेक साधू, सन्याशी अरण्यात, गुहेत राहतात, जंगली श्वापदे, साप, विंचू यांच्याशी त्यांचा दररोज संबंध येतो पण ते कधी साधूंना त्रास देत नाही. साधूंना त्यांच्याबद्दल अजिबात भीती वाटत नाही. प्राणी आणि मानव यांच्यात एकाच ईश्वराचा अंश आहे, तो आणि मी एकच आहे मग मला हा हिंस्त्र प्राणी अजिबात इजा करणार नाही अशी त्यांची दृढ भावना असतें. हा प्रबळ विचार त्यांच्या मनात असतो. प्राण्यांनाही धोका, द्वेष,कपट असणाऱ्या माणसांचा अंदाज लगेच येतो, त्यांना ती एक निसर्गदत्त देणगी असतें. समोरच्या कडून त्रास होणार नसेल तर ते उगीच कोणाच्या वाटेला जात नाही.

सर्व सामान्य माणसाने सुद्धा देवाचे अस्तित्व पहायला शिकले तर खुप छान अनुभव मिळतील. कोणीही भेटल्यावर आपण नमस्कार करतो, त्या व्यक्तीच्या शरीराला नमस्कार करण्याऐवजी त्याच्यातील दिव्य आत्म्याला स्मरूण नमस्कार केला तर एक प्रकारे दैवी शक्तीलाच नमस्कार केला असे होईल. लहान मुल, स्त्री, पुरुष, आजारी व्यक्ती, वयस्कर व्यक्ती यांमधील दिव्य आत्मा कल्पनेने पहिला तर तुम्हांला सारखाच दिसून येईल त्यात वेगळा भेदभाव दिसणार नाही. एखादी व्यक्ती आपल्यासाठी वाईट असेल पण त्याच्या मुलांसाठी, आई वडिलांना साठी तो चांगला माणूस असू शकतो .

जसे फाशी देणार जल्लाद गुन्हेगारासाठी वाईट असेल पण त्याच्या कुटुंबासाठी तो अन्नदाता असतो, मुलांसाठी तो एक चांगला पिता असतो. त्याची काहीच चूक नसते तो फक्त आपले कर्तव्य निभावत असतो. एकप्रकारे असे समजा की सरकार त्याच्या करवी गुन्हेगाराला शिक्षा देत असतें, मग तो वाईट कसा? आपल्या जीवनात आलेली वाईट माणसं, त्रास देणारी, फसवणूक करणारी माणसं ही मुळी वाईट नसतातच ती फक्त ईश्वरिय योजनेनुसार आपले कर्म, प्रारब्ध यांची शिक्षा देण्यासाठी आपल्याकडे आलेली असतात, ते फक्त निमितमात्र असतात. आपल्याला शिक्षा दिली की ते आपल्या आयुष्यातून निघून जातात आणि आपण कर्म बंधनातून मुक्त होतो. आपले कर्म खूपच वाईट असेल तर अशी माणसं आयुष्यभर आपल्या सोबत राहतात, तिथे त्यांचा दोष नसतोच, फक्त आपल्याला पूर्व कर्माची जाणीव नसते एवढेच.

दैनंदिन आयुष्यात भेटणाऱ्या माणसांना नमस्कार करताना त्यांच्या दिव्य आत्म्याला स्मरून नमस्कार करायची सवय लावा, स्मित हास्याने बोला (पण मनापासून ) तुम्हाला खुप बदल जाणवायला सुरवात होईल. मग ते तुमचे ग्राहक, विद्यार्थी, अधिकारी, सहप्रवाशी, कामगार, कामातले सहकारी, तुमची उद्धट मुलं, एखादा गुंड, एखादी भांडकुदळ सासू किंवा सून, कोणीही असो. तुमचे संबंध सुधारायला लागतील आणि तुम्ही त्यांना आवडू लागाल.

बऱ्याच वेळा पती पत्नी, सासू सून, वडील मुलगा, भाऊ भाऊ, नणंद भावजय, शेजारी शेजारी, कामगार वरिष्ठ अधिकारी, यांच्यातले संबध बिघडलेले असतात, त्याचा त्रास दोघानाही होत असतो. आपल्याला जर मनापासून हे संबंध सुधरावयाचे असतील तर उद्यापासून जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसेल तेव्हा त्याच्या दिव्य आत्म्याला, ईश्वरिय शक्तीला नमस्कार करा, त्याच्या वाईट वागणुकीकडे गुणांकडे लक्ष देऊ नका तसे केले तर काहीच अनुभव येणार नाही. फक्त दैवी योजनेनुसार तो आपल्या आयुष्यात आला आहे ती त्याची चूक नाही, कोठेतरी आपण भोग भोगून मुक्त होत आहे अशी भावना ठेवा. भांडून आणि शिवीगाळ करून काही मिळत नाही हे तुम्ही अनुभवले असेल, मग हा वेगळा प्रयत्न करून पहा.

जसा आपण एखादा प्रोजेक्ट किंवा काम हाती घेतो आणि त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत नसतात पण तरीही आपण ते पूर्ण करतो आणि मग कर्तव्य तृप्तीचा आनंद मिळतो. तसेंच एक महिन्यासाठी हा प्रोजेक्ट करून पहा. समोरचा व्यक्ती कितीही विचित्र वागू देत, तरीही त्याच्यात ईश्वर पहा आणि तो तुमची परीक्षा घेत आहे असे समजा. मीच का कमीपणा घेऊ हा अहंकार थोडा बाजूला ठेवा, तुम्हाला हळू हळू फरक जाणवेल,तुमचे संबध खुप सुधारलेले दिसतील आणि एकदा मनाला सवय लागली की ते अंगावळणी पडते.