कुंडली मध्ये शुक् ( venus) हा एक महत्वाचा ग्रह आहे. ऐश्वर्य, संपन्नता, सौंदर्य, कला, उंची वस्त्र,हिरे,अलंकार, सुगंधी द्रव, वाहन यांचा कारक मनाला जातो. जेथे शुक्राचा प्रभाव असतो तेथे सुंदरता,स्वछता आणि ऐश्वर्य पाहायला मिळते. आकाशात शुक्र ग्रह तेजस्वी, सुंदर आणि उठून दिसतो म्हणून रुपवान स्त्रीला शुक्राच्या चांदनीची उपमा दिली जाते. शुक्र आणि समृद्धी यांचे जवळचे नाते आहे.
सुंदरतेकडे समृद्धी खेचली जाते म्हणूनच आपण सुंदर बंगला, कार, कपडे, दागिने, पेंटिंग, फुले यांसाठी जास्त पैसे मोजतो. फक्त सोन्याच्या अंगठीला एवढी किंमत नसते पण जर अंगठीमध्ये हिरा टाकला तर त्या अंगठीची किंमत अनेक पटीने वाढते, म्हणजेच अंगठीत शुक्र (हिरा ) आला आणि त्याने समृद्धी अनेक पटीने वाढली . एवढेच काय शेतकरी सुद्धा देखण्या बैलासाठी जास्त पैसे द्यायला तयार असतो. दिसायला सुंदर आणि देखणे असणाऱ्या कलाकारांना चित्रपट, जाहिराती मध्ये लगेच संधी मिळते.
गरीब घरातील सुंदर मुलगी बऱ्याच वेळा श्रीमंत घरात सून म्हणून जाते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी जा आणि तेथे वातावरण पहा कसे प्रसन्न असतें. सगळे कसे सुंदर आणि चकाचक वाटते शिवाय प्रत्येक वस्तूतून श्रीमंती डोकावत असतें कारण तिथे शुक्राचा प्रभाव असतोच. अशा ठिकाणी अस्ताव्यस्तता अस्वछता, अजागळपणा अगदी अभावानेच पाहायला मिळतो.
सभोवतालच्या वातावरणाचा सुद्धा माणसाच्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो. उदा. काश्मीर च्या निसर्गसुंदर वातावरणात राहणारे काश्मिरी युवक, युवती उंच, देखणे आणि गोरेपण दिसतात. आपल्या मुलांकडे अमेरिका, यूरोप,मध्ये जाऊन काही महिने राहून आल्यानंतर त्या आईवडिलांना पहा कसे टवटवीत, गोरे आणि तजेलदार दिसतात कारण तिथल्या सुंदर वातावरणाचा तो परिणाम असतो. सुंदर वस्तू शुक्राच्या अंमलाखाली येतात आणि शुक्र तेथे समृद्धी असतेच परिणामी लक्ष्मीचा ही वरदहस्त असतो. अस्वच्छता म्हणजे अलक्ष्मीचे माहेरघर असतें.
थोडक्यात काय तर आपले घर सुंदर, स्वच्छ, सुशोभीत ठेवा, स्वतःचे राहणीमान छान, टापटीप ठेवा. समृद्धी आपल्या घरी येईल. शुक्र, लक्ष्मी, अलक्ष्मी या गोष्टींवर जरी विश्वास नसला तरी, स्वच्छ सुंदर घर आणि चांगले राहणीमान समाधान आणि प्रसन्नता तर नक्कीच देतील.