लोक काय म्हणतील ? हा प्रश्न आपल्याकडे बऱ्याच जणांना पडलेला असतो अनेक प्रगत देशांमध्ये लोक काय म्हणतील याचा सहसा कोणी विचार करत नाही त्यामुळे त्यांना सामाजिक त्रास फारसा होत नाही. कोणी कसे ही रहा, कसलेही कपडे घाला, कोणताही नोकरीधंदा करा , कोणाला काही फरक पडत नाही आणि कोणी त्याची दखलही घेत नाही. तसेच कोणी कोणाच्या आयुष्यातही सहसा डोकावून पहात नाही.प्रत्येकजण आपल्या मनाचा राजा असतो.पाहिजे तसे जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आपआपल्या मनाप्रमाणे उपभोगता येते.
लोकांपासून होणारा मानसिक त्रास, टीका, पाठीमागे होणारी कुजबुज यांचा त्रास त्यांना होत नाही…..चार लोक काय म्हणतील? हा प्रश्न आपल्याकडे अनेक जणांना पडलेला असतो, त्यातल्यात्यात सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीय मंडळी या गोष्टीचा जास्तच विचार करताना दिसतात आणि स्वतःला त्रास करून घेतात.समाज किंवा लोकं काय म्हणतील? या विचारपद्धतीचे जसे काही तोटे आहेत तसें काही फायदे पण आहेत…
अति गरीब लोकांना या गोष्टीचे काही सोयरसुतक नसते, दोन वेळचे जेवण कसे मिळेल यातच त्यांची एनर्जी खर्च होते . या वर्गातली काही लोकं पैसे भेटत असतील तर एखादे गैरकृत्य करायलाही मागे पुढे पहात नाही, प्रसंगी तुरुंगातही जातील. सामाजिक बदनामीची ते कसलीही पर्वा करत नाहीत, त्यांना नातेवाईक, भाऊबंदकी काय म्हणेल याची कसलीही पर्वा नसते. अशी माणसं, ना लोकांचा विचार करतात ना लोकं त्यांची दखल घेतात….
श्रीमंत लोकांचेही असेच असतें. त्यांनी कसलेही कपडे घातली, कसलीही केशभूषा केली, आणि कोणताही व्यवसाय सुरु केला तरी त्यांना काही फरक पडत नाही, किंबहुना ते लोकांचा विचारही करत नाही आणि लोकांच्या टिकेला भीकही घालत नाही. ते कोणत्याही जाती धर्मात लग्न करतात, अनेक वेळा घटस्फ़ोट घेतात, उतरवयानंतर सुद्धा लग्न करतात तरी लोकांना त्याचे विशेष नवल वाटत नाही.
ते कसेही असले तरी लोकं त्यांना फॉलो करतात, त्यांचे अनुकरण करायला पाहतात. त्यांनी पैशाचा भ्रष्टाचार जरी केला तरी लोकं थोडे दिवस चर्चा करून विषय सोडून देतात आणि परत कोठे एखाद्या कार्यक्रमात भेटले की त्यांनाच फुलांचा हार घालून सत्कार करतात.
लोकं काय म्हणतील? समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, शेजारी काय म्हणतील,असे प्रश्न लहानपणापासूनच आपल्या मनावर बिंबवले जातात. आपण भारतात social life जरा जास्तच जगतो त्यामुळे हा प्रश्न थोडाफार तरी प्रत्येकाला विचारात घ्यावाच लागतो किंवा त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतोच होतो. Single Mother, विधवा, घटस्फोटीत, अशा महिलांना तर समाजाचा विचार करत जगणें म्हणजे तारेवरची कसरतच असतें.
बऱ्याचदा एखादी गोष्ट स्वतः करताना आपल्याला त्याचे विशेष काही वाटत नसते पण लोक काय म्हणतील या भीतीने बरेचजण ते करायला धजावत नाही किंवा अनेकांची स्वप्ने, इच्छा, आवड, छंद, हौस फक्त या गोष्टींचा विचार केल्यामुळे मागे पडतात. एवढेच नाही तर लोक काय म्हणतील या गोष्टींचा जास्त विचार केल्यामुळे आणि गरज असून सुद्धा एखाद्या खालच्या दर्जाची नोकरी किंवा व्यवसाय करायला काहीजण तयार होत नाही. लोकांचे म्हणणे आपण किती मनावर घेतो ते यावरून लक्षात येते….
बऱ्याचदा लोकं काय म्हणतील याचा विचार न करता केलेल्या काही कृती खरोखर एखाद्या साध्या माणसाला त्रासदायक ठरतात किंवा लोक त्यांना टोमणे मारून पार बेजार करून टाकतात, प्रसंगी वाळीत पण टाकतात आणि त्याचे जीवन नकोसं करतात पण रगील, बेपर्वा,हट्टी, हेकेखोर माणसांना याचा काही फरक पडत नाही. ते लोकांच्या अशा वागण्याला सडेतोड उत्तरे देतात….आपल्याकडे जर एखाद्या मुलीने आंतरजातीय विवाह केला किंवा पळून जाऊन एखाद्या मुलाबरोबर लग्न केले तर आजही तो मोठा गुन्हा ठरतो. मुलीने तोंडाला काळे फासले, समाजात तोंड दाखवायला जागा राहिली नाही अशी प्रतिक्रिया आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांची असतें.
एखादा बाप पोरीच्या अशा कृतीमुळे आणि सामाजात झालेल्या बदनामी मुळे हाय खाऊन मरून जातो. काही ठिकाणी मुलीचे जिवंतपणीच श्राद्ध घालून ती आमच्यासाठी मेली म्हणून संबंध तोडून टाकतात तर काही ठिकाणी नातेवाईक प्रतिष्ठेपाई मुलीचा खून करतात किंवा कायमचे संबध तोडून टाकतात. अगदी बारीक विचार केला तर यामागेसुद्धा लोकं, नातेवाईक, भाऊबंदकी काय म्हणेल हीच मूळ भीती त्यांच्या मनात असते. ज्या ठिकाणी ते राहतात, ज्या समाजात ते वावरतात तिथे त्यांना रोज तोंड द्यावे लागते, लोकांच्या टीका, टोमणे सहन करावे लागतात.
यात त्या आईवडिलांची तरी काय चूकअसतें? मुलीला कायद्याने कोणाशीही लग्न करण्याचा अधिकार आहे पण आपल्या पाठीमागे आपल्या घरच्या लोकांची काय अवस्था होईल हा विचार तिने थोडा तरी करायला हवा किंवा या गोष्टी सुरु होण्याआधीच लोकं काय म्हणतील याचा विचार मुलाने किंवा मुलीने केला तर पुढे वाईट वेळ येणार नाही. चार पाच वर्षांपूर्वी आलेला सैराट हा चित्रपट, लोकं काय म्हणतील याच संकल्पनेवर आधारित होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रतिष्ठित बापाची झालेली बदनामी आणि लोकं काय म्हणतील या भीतीपोटी त्यांनी मुलीचा संसारच उध्वस्त करून टाकला….
समाजात चांगला मान, प्रतिष्ठा असलेल्या बापाचा एखादा रिकामटेकडा किंवा गुंडागर्दी करणारा मुलगा आणि दारू पिऊन बायको मुलांना मारहाण करणारा एखादा व्यसनी नवरा हे एकाच माळेचे मणी असतात. त्यांना कितीही समजावून सांगितले तरी ते ऐकणार नाहीत. इथे लोक काय म्हणतील याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. सामाजिक बदनामी त्यांनी आधीच गृहीत धरलेली असतें. असे वागणे म्हणजे त्यांच्या जगण्यातला एक स्वार्थीपणाच असतो. ते फक्त आपल्यापुरताच विचार करत असतात…
आपल्यामुळे आपल्या घरच्या लोकांना किती त्रास होतो याचा ते थोडाही विचार करत नाही किंवा त्यांना त्यांच्याबद्दल थोडीही दया आणि कीव येत नाही. आपल्या माणसांसाठी तरी यांनी, लोकं काय म्हणतील? याचा विचार जरूर करायला हवा. याचा अर्थ समाज काय म्हणेल ? ही गोष्ट विचारात घेणे येथे त्यांना नक्कीच फायदयाचे ठरू शकते किमान त्यामुळे तरी ते सुधारले जाऊ शकतात……
आपण जर अभ्यास केला नाही तर नापास होऊ, आई वडिलांच्या कष्टाची कमाई वाया जाईल, मग नातेवाईक काय म्हणतील? पालक काय म्हणतील हा विचार घरापासून दूर राहणाऱ्या किंवा होस्टेल वर राहणाऱ्या विद्यार्थ्याने केला तर त्याचा निश्चितच फायदा होईल किंवा वृद्ध आई वडिलांना न सांभाळणाऱ्या, वृद्धाश्रमात धाडणाऱ्या मुलाने किंवा सुनेने, लोक काय म्हणतील? हा विचार जर केला तर लोकांच्या, समाजाच्या लाजेखातर तरी पुढच्या वाईट गोष्टी टाळल्या जाऊन काहीतरी चांगले घडू शकते ….
एखाद्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने जर रस्त्याच्या कडेला एखादी टपरी टाकून व्यवसाय चालू केला किंवा एखादी साधी, कमी पगाराची नोकरी सुरु केली आणी जर लोकं त्याला म्हणत असतील की एवढा चांगला शिकलाय आणि हे धंदे करतोय……? तर त्याने लोकांचे म्हणणे विचारात घेता कामा नये कारण ही लोकं त्याला घर चालवायला पैसे आणून देणार नाहीत की लग्नासाठी मुलगी पण देणार नाही मग त्याने लोक काय म्हणतील हा विचार तरी का करावा ? त्यापेक्षा त्याने आपली सध्याची गरज काय आहे याच्यावरच लक्ष केंद्रित करायला हवे…..
मुलंबाळं झाल्यावर एखाद्या स्त्रीने जर पुढचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा एखादा छंद जोपासायचा प्रयत्न केला तर लोकांचा विचार तिने न केलेलाच बरा.. अश्या काही उदाहरणा वरून वाटते की कधी कधी लोकांचा विचार न करणेच फायदयाचे ठरते….शेवटी आपल्या मनात एक शंका राहतेच….. ती म्हणजे, लोक काय म्हणतील हा विचार करावा की नाही? त्याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्हीही आहे.जेव्हा आपण चुकीचे काम करत नाही, आपल्यामुळे आपल्या घरच्या लोकांना समाजात मान खाली घालावी लागणार नाही किंवा त्यांना मानसिक त्रास होणार नाही अशी जेव्हा तुमच्या मनाला खात्री पटते तेव्हा तुम्ही नक्कीच Right track वर आहात, तुमचे काम चांगले आहे पण लोकं तुम्हाला बदनाम करू पाहतायेत मग अशावेळेस लोकांचा विचार कशाला करायचा?
काही लोकं फक्त असूया, मत्सर, कपट, या भावनेतून तुमच्याविषयी वाईट बोलत असतात पण आतून तुम्ही त्यांना वरचढ वाटत असता, अशी माणसं वेळीच ओळखता आली पाहिजेत. शेवटी काहीही केले तरी लोकं नावे ठेवतच असतात. अशावेळेस पाठीमागे कोणी कितीही भुंकले तरी तुमचा मानसिक तोल जाता कामा नये, तुमच्या मतांवर तुम्ही ठाम राहायला हवे…. आपण बरोबर आहोत ना…. मग कशाला चिंता करायची ? यश मिळाल्यावर किंवा तुमचा निर्णय बरोबर होता हे सिद्ध झाल्यावर हीच लोकं आपला उदो उदो करत असतात.
कोणतीही गोष्ट करताना आपल्या मनाला वाटत असेल की यामुळे आपल्या प्रियजणांना त्रास होईल, ते अडचणीत येतील, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळेल किंवा आपल्या कृतीमुळे कोणाचे तरी नुकसान होईल त्यावेळेस ती गोष्ट न केलेलीच बरी….आपण जी कृती करतोय त्या कृतीमुळे लोकं काय म्हणतील असे सारखे वाटत असेल, कोठे तरी अपराधी भावना जाणवत असेल तर तेथे थांबलेलेच बरे….. लोकांची भिती, समाजाची भीती, ही कदाचित तुम्हाला चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवेल किंवा परावृत्त करेल. म्हणून लोकं काय म्हणतील याचा जरूर विचार करावा पण ते सर्वस्वी त्या परस्थिती वर अवलंबून असावे…..