Happy Man in Today’s World | आजच्या जगातील सुखी माणूस

Happy Man in Today’s World: आज-काल खरा सुखी माणूस शोधून सापडणे तसे अवघडच म्हणावे लागेल. प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या गोष्टीत असमाधानी असतोच. एखाद्याची एक बाजू चांगली असेल तर दुसऱ्या बाजूत कोठे तरी उणेपणा जाणवतो. सगळ्या दृष्टीने परिपूर्ण माणूस सापडणे तसें कठीणच.

आपण म्हणतो सुख हे मानण्यावर आहे पण अशी विचारसरणी असणारी किती लोकं सापडतील? अगदीच नगण्य. सुखी माणसाची व्याख्या ढोबळमनाने आजही करता येऊ शकते. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्य दृष्ट्या जो माणूस सुखी तोच आजच्या घडीला सुखी माणूस आहे असे मला वाटते.

सामाजिक सुखाचा अभाव

एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाकडे पैसा, शरीरसंपत्ती, कौटुंबिक सुख भरपूर प्रमाणात असते पण सामाजिक दृष्ट्या तो सुखी नसतो, सामाजिक बदनामी हा त्याचा वीक पॉइंट असतो. समाजात मान नसल्यामुळे ताठ मानेने त्याला जगता येत नाही म्हणून तो दुःखी असतो. लोकांसाठी तो कितीही सुखी वाटत असला. तरी लोकांच्या मनातला आदर, प्रतिष्ठा, आपलेपणा त्याला मिळत नाही. या गोष्टींसाठी तो मनात दुःखी असतो ,म्हणून सामाजिक सुख नसणे ही सुद्धा एक असमाधान आणि दुःखाचीच बाब आहे

आर्थिक सुखाचा अभाव

एखाद्या सज्जन आणि हुशार माणसाला समाजात भरपूर मान असतो, आरोग्य सुख असते , कुटुंबसुख असते, पण तो गरीब असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या तो सुखी नसतो. पैशाअभावी त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून तो दुःखी असतो. येथे हुशारी आणि सज्जन पणा त्याच्या कामाला येत नाही त्याला इथे पैसा महत्वाचा वाटतो

आरोग्य सुखाचा अभाव

एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक बाजू चांगल्या असतात पण शारीरिक दृष्ट्या तो सुखी नसतो. एखादा आजार, किंवा अपंगत्वामुळे तो दुःखी असतो. त्याच्या दृष्टीने मला पैसा, प्रसिद्धी नको पण माझे शरीर मला तंदुरुस्त हवे आहे. एखादा निकामी झालेला शारीरिक अवयव परत जसाच्या तसा ओरिजनल मिळविण्याची सोय असती तर ते कितीही संपत्ती दयायला तयार होतील. आजारामुळे होणाऱ्या भयानक वेदनेच्या बदल्यात ते कितीही पैसे मोजतील.

अनेक उदयोगपती, राजकारणी, आणि श्रीमंत व्यापारी जेव्हा दुर्धर आजारामुळे मृत्यूशय्येवर असतात. तेव्हा त्यांना पैसा, प्रसिद्धी यापेक्षा निरोगी शरीर खूप महत्त्वाचे वाटते.

कौटंबिक सुखाचा अभाव

काही माणसं आर्थिक, सामाजिक, शारीरिक दृष्ट्या अतिशय नशीबवान असतात. पण कौटुंबिक सूख मात्र अजिबात नसते. काही अनाथ असतात तर काहींना संतती नसते. काही आजन्म अविवाहित असतात तर काहींचे घरातल्या कोणाशीच पटत नाही. त्यांच्या दृष्टीने कुटुंब सुख किती महत्वाचे असते, हे फक्त त्यांनाच माहीत असते. लता मंगेशकर, रतन टाटा, दादा कोंडके, यशवंतराव चव्हाण या महान व्यक्तींकडे सगळी सुखे होती पण कौटुंबिक दृष्ट्या ते असमाधानी होते.  एवढी संपत्ती, ऐश्वर्य आहे पण त्याचा उपभोग घ्यायला आपले स्वतःचे कोणीच नाही याची खंत त्यांना लागून होती.

लता मंगेशकरांनी एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की मला परत लता व्हायची इच्छा नाही, कारण लता होण्याच दुःख त्यांनाच माहित होती. दादा कोंडकेंनी त्यांच्या आत्मचरित्रात शेवटी म्हटले आहे की “देवा मला पुढच्या जन्मी पैसा प्रसिद्धी देऊ नको पण आपली स्वतःची, प्रेमाची माणसं दे, एकटेपणा मात्र आजिबात देऊ नको. एकटेपणा त्यांना किती सतावत होता हे यावरून आपल्या लक्षात येते.

आपल्याला प्रश्न पडतो की मग सगळ्या बाजुने परिपूर्ण आणि सुखी माणूस कोठे सापडेल? अशी माणसं आपल्या आसपास भरपूर असतात. एखादा सघन शेतकरी, मध्यम वर्गीय नोकरदार वर्ग, सरकारी अधिकारी, एखादा शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, एखादा उद्योजक ही माणसं सगळ्या दृष्टीने सुखी असू शकतात. यात बरेच जण आर्थिक, सामाजिक, आरोग्य, आणि कौटुंबिक या चारही बाजूने परिपूर्ण असतात.हीच लोकं आजच्या दृष्टीने खरी सुखी आहेत असे म्हणता येईल.

तरी पण त्यातल्या काहींना त्या सुखाची खरी किंमत माहित नसते ते अजून कोठेतरी सुख शोधण्यात गुंतलेले असतात. दुसऱ्यांशी तुलना करून ते स्वतःला दुःखी करून घेतात . तुलना करणे ही फार मोठी शोकांतिका आहे ,कोणी नातेवाईकांशी तुलना करतो , कोणी मित्रांशी तुलना करतो , कोणी शेजाऱ्यांशी तुला करतो तर कोणी ऑफिसमधल्या सहकाऱ्यांबरोबर तुलना करतो. दुसऱ्या लोकांशी तुलना आणि बरोबरी केल्याने काही लोक कर्जबाजारी होताना दिसतात .मी आनंदी आहे, आमचं मस्त चाललंय, ही वाक्य सुद्धा समाधान आणि आनंद देऊन जातात. आपल्या पेक्षा खालच्या लोकांची दुःख पाहून जर आपण आहे त्या परिस्थितीत सुख मानले आणि ईश्वराचे आभार मानले तर तेथूनच आपल्या खऱ्या सुखी जीवनाचा प्रवास सुरु होईल.