Annadan – The Best Charity | अन्नदान – श्रेष्ठ दान 

Annadan – The Best Charity: “अन्न हेच पूर्णब्रम्ह” या एका वाक्यात पूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. अन्न ही पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची महत्वाची गरज आहे. उदा., मानव, पशु, पक्षी, वनस्पती, कीटक इ. हिंदू संस्कृती मध्ये अन्न दानाला खुपच महत्व दिले गेलेले आहे. नर्मदाकाठी परिक्रमा करणाऱ्यांना जेऊ घालण्यासाठी लोकं अक्षरशः मागे लागतात. पंढरीच्या दिंडीला जाणाऱ्या वारकऱ्यांना जेवन देण्याची प्रथा आपल्या महाराष्ट्रात पूर्वी पासून चालत आलेली आहे.

आपल्या प्रत्येक धर्मग्रंथात अन्नदानाची महती सांगितली आहे. अन्नदानाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि अन्नदात्याची भरभटात होत राहते असे म्हणतात. शीख धर्मातही अन्नदानाला खूप महत्व दिले गेले आहे. त्यांच्या प्रत्येक गुरुद्वारामध्ये लंगर लावून अन्न दान केले जाते. जगात कोठेही आणीबाणीचा प्रसंग येवो, नैसर्गिक आपत्ती येवो, हा समुदाय अन्नदानासाठी पुढे असतो. आपल्या मासिक उत्पनातून काही भाग हे अन्नदानासाठी गुरुद्वाराला देत असतात. उद्योग व्यवसाय आणि त्याला अन्नदानाची पुण्याई या मुळेच कदाचित शीख लोक समृद्ध असावेत. यांच्यात भिकारी शोधूनही सापडत नाही असे म्हटले जाते.

अशीच एक सत्य घटना वाचन्यात आली होती, नक्की आठवत नाही ती कोणत्या शहरातली होती. एक गरीब कर्जबाजारी विधवा स्त्री होती आणि तिने संकल्प केला की दरवर्षी संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी भिकारी लोकांना जेवण द्यायचे. शेकडो भिकारी जेवून तृप्त होत आणि तिला आशीर्वादही देत. भुकेल्या पोटी एवढे चांगले जेवण मिळाले म्हणून त्यांचे आशीर्वादही अगदी मनापासूनच असले पाहिजेत. कारण ज्याला गरज असते त्यालाच त्याचे महत्व कळते. असे चार पाच वर्ष केल्यानंतर तिला व्यवसाय करण्याची इच्छा झाली आणि व्यवसायात खुप भरभराट झाली. बंगला, सोने, नाणे सगळे काही मिळाले आणि मुलींची लग्नही झाली. अन्नदानाला उद्योगाची जोड असली की यश निश्चितच मिळेल.

अन्नदान हे आपल्या ऐपतीप्रमाणे करावे मोठा बडेजाव करण्याची पण काही गरज नसते. शेवटी दानत असणे महत्वाचे आहे कारण शबरीची उष्टी बोरं आणि सुदाम्याचे पोहे पण ईश्वराने गोड मानून घेतलेले आहेत. शिर्डीचे साईमंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर ही भारतातील श्रीमंत देवस्थानं आहेत. अन्नदानाचे काम तिथे बाराही महिने चालू असते. हजारो लोक दररोज जेवून जातात. कदाचित या कारणामुळेच या देवस्थानांची भरभराट झाली असावी. अन्नपूर्णा आणि लक्ष्मी खऱ्या अर्थाने येथे एकत्र नांदताना दिसतात.

मुक्या जनावरांना अन्न पाणी देणे ही सुद्धा एक ईश्वर सेवाच असते. एक वेळेस खाल्लेल्या अन्नाला माणूस जागणार नाही पण प्राणी मात्र नक्की इमान राखतात. आपल्या उपकार कर्त्याला कधी धोका देणार नाहीत, भले ते कितीही हिंस्त्र असु देत. अन्न आणि प्रेम दिलेल्या माणसाला प्राणी कधीच विसरत नाही. अशी अनेक उदाहरणे जगात आहेत त्यापैकी डॉ. प्रकाश आमटे हे त्याचे जिवंत उदारण आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पाण्याची जरी सोय केली तरी अनेक प्राणी, पक्षी यांची तहान भागून खुप मोठे पुण्य आणि समाधान लाभेल. हल्ली मोठ-मोठे लग्न समारंभ, पार्ट्या, जेवणावळी मध्ये अनेक लोक जेवून जातात. कधी कधी अन्नाची नासधूसही होते, खुप अन्न उष्टे टाकले जाते, उरलेले अन्न फेकले जाते आणि परत जेवणाला नाव ठेवणारे महाभाग आणखी वेगळेच. मग हे पुण्य यजमानाला लाभत असेल का? हा मोठा वादाचा विषय ठरेल, कारण बऱ्याच वेळा काही लोक अशा खर्चामुळे आर्थिक अडचणीत आलेले दिसतात किंवा कर्जबाजारीही होतात.

अन्नदान हे जर गरजू व्यक्तीला झाले तर त्याच्या आशीर्वादाने भरभराट नक्कीच होईल. जसे शरीराला गरज नसताना औषधं दिले तर काही फायदा होत नाही परंतु नुकसानीची मात्र दाट शक्यता असते, तसेच अन्नदान हे जिथे गरज आहे. तिथेच झाले तर ते खऱ्या अर्थाने सत्कारणी लागते. शेवटी अन्नदान ही एक साधना आहे. ती निःस्वार्थ भावनेने आणि सातत्याने जर केली तर काही वर्षांत भरभराट निश्चितच होईल आणि जो उद्योग कराल त्यात यशही येईल. शिवाय अशी श्रीमंती दीर्घकाळ टिकते कारण त्याला पुण्याईचे पाठबळ असते.