जे चिंती परा ते येई घरा | Think better for Others

असे म्हटले जाते की, आपण दुसऱ्या बद्दल जो विचार करतो तशाच गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करत असतो. ( Think better for others ) अध्यात्मामध्ये असा ही एक नियम आहे की, जो बऱ्याच वेळा आपल्याला अनुभवास येतो. अनेक लोकांच्या फायद्यासाठी केलेला कोणताही विचार किंवा कृती तात्काळ फळाला येते किंवा त्याला अनेक मार्गांनी मदत मिळते. परोपकाराने पुण्याई मिळते हे आपण अनेक ग्रंथांमध्ये वाचले असेल.

पुराणकाळात याबद्दल अनेक कथाही आहेत, त्या आपल्यासमोर घडल्या नसल्यामुळे त्यांच्यावर आपला कधी कधी विश्वास बसत नाही, पण हा एक निसर्ग नियम आहे किंवा त्याला आपण दैवी नियम म्हटले तरी चालेल आणि त्याची प्रचीती आजच्या जगातही येते. स्वार्थी भावनेने किंवा मला एकटयालाच काय ते हवे अशी विचारसरणी असलेली व्यक्ती थोड्या काळासाठी प्रगती करते. पण अनेकांचे कल्याण व्हावे किंवा मानवजातींचे कल्याण व्हावे या दृष्टीने विचार करणारी व्यक्ती अमर्याद प्रगती करते किंवा त्यांचे यश खूप काळ पर्यंत टिकून राहते. ईश्वरीय शक्ती किंवा नियतीही अशा लोकांना कोणत्याना कोणत्या मार्गाने मदत करत असतें.

पूर्वीच्या काळी ऋषीं मुनींना कठोर साधनेने सिद्धी प्राप्त होत असत, पाहिजे ती वस्तू किंवा सुविधा ते आपल्या योग सामर्थ्याने क्षणात हजर करु शकत असत पण त्याला एक नियम होता. स्वतःच्या फायद्यासाठी त्या सिद्धीचा वापर केला तर त्या योग्याची अध्यात्मिक प्रगती खुंटत असे किंवा त्या सिद्धीची ताकत नष्ट होत असे, पण जर, जनकल्यानासाठी त्या सिद्धीचा वापर केला तर त्या योग्याची अध्यात्मिक पातळी अजून उंचावत असे. स्वतः बैरागी अवस्थेत जगून, सिद्धीचा वापर ते इतर लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असत.

आजही हा नियम तेवढाच कार्यरत आहे. साधं Google चे च. उदाहरण घ्या ना..आपण त्यांच्या कितीतरी सर्विसेस मोफत वापरतो. गुगल म्हणजे आजच्या जगाला मिळालेले एक वरदान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गुगल सर्च मुळे बसल्या जाग्यावर आपल्याला सगळी माहिती मिळते. Gmail मुळे मोफत ई-मेल पाठवू शकतो. गुगलचेच प्रॉडक्ट You tube चे व्हिडीओ पाहून आपल्याला कितीतरी माहिती मिळते किंवा लोकं तेथे व्हिडीओ अपलोड करून पैसे कमावतात . Google drive, Google map, Google photos. अशा अनेक गोष्टी आपल्याला मोफत आहेत त्यामुळे जगातल्या करोडो लोकांना त्याचा फायदा झालाय, लोकांचे जीवन अजून सुसह्य झाले आहे . ज्यांना आपल्या व्यवसायासाठी Google ची सेवा हवी आहे त्यांच्याकडून मात्र ते पैसे घेतात. म्हणजे किती साधं आणि फायदेशीर बिझनेस मॉडेल आहे. Google म्हणजे जणू काय अल्लाउद्दीनचा दिवाच आहे, जी माहिती पाहिजे ती लगेच सर्च केली की आपल्याला हजर होते. आज गुगल ही जगातली खूप मोठी कंपनी आहे आणि त्यांना पुढे कोणी स्पर्धक तयार होईल असे आज तरी वाटत नाही.

व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वापरायला सुद्धा आपण पैसे देत नाही. हे वापरल्यामुळे मानवाच्या जीवनात अनेक गोष्टी सुसह्य झाल्या आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोगही होत आहे. ते वापरल्या शिवाय आता आपला दिवस जात नाही. आपण तर यांना पैसे देत नाही तरी पण या कंपन्या आवाढव्य झाल्या आहेत, अमाप पैसा कमवत आहेत. सुरवातीच्या काळात जेव्हा त्यांनी ही संकल्पना आणली असेल तेव्हा एक छंद, आवड, किंवा काहीतरी नवीन करायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट असेल. पुढे जाऊन याची एखादी मोठी कंपनी होईल हे तेव्हा त्यांनाही माहित नसेल. आज अब्जावधी लोकांचा फायदा होतोय मग ते मोठे होणारच.. अनेकांचा फायदा करणाऱ्याची भरभराट होणारच हा निसर्ग नियम येथेही लागू पडतोय.

शास्त्रज्ञ जेव्हा एखादा शोध लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो पैसा हे उद्दिष्ट ठेऊन काम करत नाही, एक तर त्याची ती आवड असतें किंवा एखाद्या अडचणीवर कशी मात करता येईल एवढाच त्यांचा विचार असतो आणि यातच त्यांना आंनद वाटत असतो. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रसिद्धी आणी पैसा आपोआपच माठीमागे येतो . लोकांचा फायदा करता करता त्यांनाही फायदा मिळून जातो.

एके काळी अमेरिकेत कार घेणे हे फक्त श्रीमंत लोकांनाच परवडत असे. प्रत्येक अमेरिकन माणसाला कार घेता यावी म्हणून अतिशय स्वस्त आणि परवडेल अशी कार काढण्याचे स्वप्न हेनरी फोर्ड या उदयोगपतीने पहिले आणि फोर्ड कंपनीने त्यांच्या कारचे टी मॉडेल बाजारात आणले आणि कार घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात आले. त्या कारची इतकी विक्री झाली की त्यामुळे हेनरी फोर्ड त्याकाळी जगातला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गणला गेला . येथे संकल्पना फक्त सामान्य माणसाला परवडेल अशी कार बनविणे ही होती. पैसा, प्रसिद्धी, हा नंतरचा भाग होता कारण कार चालेल – नाही चालेल, कंपनीला परवडेल- नाही परवडेल हे पुढचे भावि्तव्य कोणालाच माहित नव्हते. पण हेनरी फोर्डने तळागाळातल्या लोकांचे स्वप्न साकार केले, आणि परत तो नियम सिद्ध झाला जे चिंती परा ते येई घरा. दुसऱ्याचा फायदा केला की आपला फायदा होतोच.

चीन या देशाची विचारसरणी आणि ध्येय धोरणे आज जगाला पटत नाही पण जगाच्या खिशाला परवडेल अशा स्वस्त वस्तू तयार करून ते मालामाल झाले हे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. पाठीमागे सोशल मीडियावर पनवेल जवळ कळंबोली येथे एक वडापाव विकणाऱ्या स्त्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ती 10 रुपयात चांगल्या क्वालिटीचा वडापाव विकते. दररोज शेकडो वडापाव विकले जातात. त्या स्त्रीचे सगळे कुटुंब आज तेथे काम करते. आजच्या महागाई च्या जमान्यात दहा रुपयात काय येते??? सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल अशी ते सेवा देतात मग भरभराट तर होणारच शिवाय त्यांना स्पर्धक निर्माण होणे अवघडच.. कारण त्याच्या खाली जाऊन कोणाला विक्री करायला परवडेल असे वाटत नाही.

नादब्रम्ह इडली हे पण त्याचेच एक उदाहरण आहे. कोविडच्या काळात झिरो असलेल्या माणसाची आज फार मोठी उलाढाल आहे कारण सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी किंमत त्यांनी ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी एका साऊथ इंडियन हॉटेल व्यवसायिकाशी बोलणे झाले होते तो म्हणाला त्याच्या गुरु ने त्याला सांगितले होते की व्यवसाय करताना पैशाच्या मागे लागू नको तर व्यवसायात नाव कमव. मालाचा दर्जा उत्तम ठेव आणि ग्राहकाला उत्तम सेवा दे, पैसा आपोआप पाठीमागे येईल.. मग त्याने तेच केले आणि यशस्वी झाला.

थोडक्यात सांगायचे म्हणजे कर्माच्या नियमानुसार कर्म केल्यावर फळ हे मिळनारच तसेच व्यवसाय केल्यावर प्रगती ही होणारच.. चांगला दर्जा आणि सर्व्हिस दिली तर व्यवसाय भरभराटीस येणारच पण अनेकांचा फायदा पाहून केलेले कोनतेही कृत्य अधिक प्रगतीकडे घेऊन जाते हे मात्र निश्चित आणि त्याचा परिणाम अधिक काळ टिकून राहतो..हे ही तितकेच खरे.