संगत म्हणजेच सहवास, Sangat ani Sahavas यांचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम दिसून येतो . जशी आपली संगत असतें तशी आपल्या जीवनाला दिशा मिळते आणि दुसर्यांच्या सूचनांचे पालन आपण जसे करू तसे आपन बनत जातो.
आपल्याला ज्या लोकांचा सहवास लाभतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनाला दिशा किंवा कलाटणी मिळते. वडिलधाऱ्या माणसांकडून आपण नेहमी ऐकत आलोय की चांगल्या मित्रांची संगत करत जा किंवा आमक्या तमक्याशी मैत्री करू नको. यामागे हेच कारण असते की आपल्या संपर्कात आलेल्या लोकांच्या विचारांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपण तसें वागायला लागतो. जितकी जास्त दिवस संगत राहते तितकी ती जास्त परिणामकारक ठरते. यावरूनच ती म्हण प्रचलीत झाली ” ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण आला” किंवा अजून एक म्हण आहे ” असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ “.
आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती व त्यांच्यातून निघणाऱ्या विचार लहरी, तरंग, ऊर्जा या आपल्या अंतर्मनात जातात आणि आपल्यावर परिणाम करायला लागतात. हळू हळू आपले वागणे त्याप्रमाणे बदलत जाते. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर आपल्याला खूप बरे वाटते तर काहींच्या संपर्कात आल्यावर खूप अस्वस्थ वाटते. याचे कारण त्या व्यक्तीच्या विचारलहरी आणि ऊर्जा असतें आणि या गोष्टी आपल्यावर परिणाम करतातच . चांगल्या व्यक्तीचा चांगला परिणाम आणि वाईट व्यक्तीचा वाईट परिणाम दिसून येतो. एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या बलवान किंवा हट्टी, हेकेखोर असेल किंवा एखाद्याने निग्रहाने ठरविले तरच त्याच्यावर इतरांच्या संगतीचा किंवा विचारांचा प्रभाव पडत नाही पण सर्वसामान्य,साधीभोळी,काहीतरी मजबुरी असलेली माणसं, किंवा दुसर्यांच्या मनाचा जास्त विचार करणारी माणसं, दुसर्यांच्या विचार प्रभावाखाली लगेच येतात आणि त्यांचे अनुकरण करतात किंवा त्यांच्याप्रमाणे वागायला सुरवात करतात.
सहवास किंवा मैत्रीमुळे काही लोकं खूप प्रगती करतात.अभ्यासू मित्र असेल तर त्याच्या नादाने काही मुलं अभ्यासात चांगली प्रगती करतात. व्यवसायिक मित्र असतील तर ते व्यवसायासाठी मदत करतात. धार्मिक मित्र असतील तर कदाचित धार्मिकतेकडे ओढा वाढू लागतो आणि वाईट मित्र असतील तर वाईट वर्तनाकडे वाटचाल सुरु होते. बऱ्याचदा छंद आणि आवड या गोष्टी सुद्धा सहवासातूनच लागतात, तसेच व्यसनंही संगतीतूनच लागतात. कोणत्याही व्यसनाच्या खूप खोलवर जाऊन पाहिले असता असे लक्षात येते की व्यसनं हा संगतीचाच परिणाम असतो.
अगदी सुरवातीला एकटा माणूस जाऊन कधी दारू पिणार नाही किंवा सिगारेट ओढणार नाही. तसेच तंबाखू किंवा अन्य व्यसनेही करणार नाही. ही सुरवातच कोणीतरी आधी व्यसन करीत असलेल्या व्यक्तींच्या जास्त काळ संपर्कात आल्याने होते. एखादयाने दिलेली फुकटची ऑफर किंवा मैत्रीची घातलेली शपथ, एकदाच ट्राय करून पहा म्हणून केलेला आग्रह किंवा अति आग्रह अशा अनेक कारणातून होते.
सत्याचे प्रयोग या महात्मा गांधींच्या आत्मचरीत्रात ते सांगतात की, ते एका वाईट मित्राच्या संगतीत राहतात . तो जरी वाईट असला तरी गांधीना तो हिरो वाटायचा. घरच्या लोकांना तो मुलगा कसा आहे हे माहित होते आणी ते वारंवार गांधीजींना त्याच्यापासून दूर राहायला सांगत पण गांधीजी त्यांना सांगत की तो जरी वाईट असला तरी मी त्याला सुधारून दाखवील. वगैरे..वगैरे हळू हळू त्या वाईट मित्राच्या विचारांचा पगडा गांधीजीच्या मनावर बसला आणि त्यांनी सगळी व्यसने करून पाहिली . त्या मुलाला सुधारणे तर सॊडाच पण गांधीजीच त्याच्या विचारांच्या प्रभावाखाली आले. असा आहे हा संगतीचा महिमा.
आपण थोडे इतिहासात डोकावून पहिले तर अशी खूप उदाहरणे सापडतील की जी संगतीमुळे अजरामर झाली आहेत किंवा लयाला गेली आहेत. श्रीकृष्णाच्या संगतीमुळे अर्जुन आणि सुदामाचे आयुष्य बदलले तर दुर्योधनाच्या संगतीमुळे कर्ण बरबाद झाला. रामाच्या मैत्रीमुळे बिभीषण लंकाधीश झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे दोन तुकडे झाले. पूर्व जर्मनी रशियाच्या अधिपत्याखाली गेला आणि पश्चिम जर्मनी अमेरिकेच्या अधिपत्याखाली गेला . अमेरिका प्रगत आणि शक्तिशाली राष्ट्र असल्यामुळे पश्चिम जर्मनीने खूप प्रगती केली परंतु रशियाच्या ध्येय धोरणामुळे पूर्व जर्मनीने मात्र म्हणावी तशी प्रगती केली नाही. तसेच कोरिया या देशाचेही झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचे दोन तुकडे झाले. दक्षिण कोरिया अमेरिकेच्या प्रभावाखाली असल्यामुळे तिथे खूप प्रगती पाहायला मिळते तर उत्तर कोरिया हा देश रशिया आणि चीन च्या प्रभावाखाली असल्यामुळे तिथे मात्र गरिबी आणी हुकूमशाही पाहायला मिळते. हे सगळे परिणाम कोण कोणाच्या सहवासात आल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात.
आपण कौटंबिक पातळीवर विचार केला तर असे पाहायला मिळते की वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले, वेगवेगळ्या विचारसरणीचे असलेले मुलगा आणि मुलगी लग्नानंतर जेव्हा पती पत्नी म्हणून अनेक वर्ष एकत्र राहतात तेव्हा सहवासाने त्यांचेही एकमेकांचे काही गुण,
आवडीनिवडी,छंद, जुळताना दिसतात. सुरवातीला कदाचित एकाला एक गोष्ट आवडते आणी दुसऱ्याला ती आवडत नसते पण प्रेमापोटी किंवा उगीच वाद नको म्हूणन ते एकमेकांशी मिळते जुळते घेतात आणि मग पुढे जाऊन ती सवय बनते. याला थोडे फार अपवाद पण असतील. काही वर्षानंतर अनेक जोडप्यांची तर चेहरेपट्टी पण मिळती जुळती दिसायला लागते कारण ही आहे सांगतीची जादू.
आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आणि निसर्गाचाही आपल्यावर परिणाम होताना दिसतो. खेड्यातली मुलगी जेव्हा शहरात राहायला जाते तेव्हा ती तेथील भाषा आणि राहणीमान आत्मसात करते आणि पहिल्यापेक्षा अधिक निटनेटकी आणि आत्मविश्वासू वाटते. परदेशात राहणारे तरुण त्या देशातील रहदारीचे नियम, कायदे कानून व्यवस्थित पाळतात पण मायदेशात आल्यावर मात्र तसें पाळताना दिसत नाही किंवा इच्छा असूनही नियम पाळता येत नाही. याला कारणीभूतही आसपासची परस्थितीच असतें. एका ठिकाणी शिस्त पाळणारा माणूस दुसरीकडे बेशिस्त कसा असू शकेल? थोडक्यात माणूस हा शिस्त किंवा बेशिस्त नसतो तर तो ज्या प्रदेशात किंवा लोकांच्या संपर्कात जातो त्याप्रमाणे तो बनतो.
घरी अतिशय उनाड असलेली मुलं मिलिटरीत किंवा होस्टेल मध्ये गेल्यावर शिस्त पाळतात त्याचे कारण तिथल्या वातावरणाचा सहवास आणि तेथील लोकांची संगत हीच कारणीभूत असतें. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण ज्या गोष्टीच्या सहवासात राहतो त्याचे परिणाम आपल्यावर होतात हे निश्चित. मग ते मित्र,नातेवाईक, आई वडील, एखादा प्रदेश किंवा ठिकाण काहीही असू दया..
पुढील भागात वाचा – सूचना आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात..