जशी संगत आणि सहवास आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजवतात त्याचप्रमाणे सूचना (Suggestions) सुद्धा आपल्या आयुष्यात फार मोठी भूमिका बजावतात. आपण हिप्नॉटिझम ( संमोहन ) चा कार्यक्रम जर स्टेजवर, टीव्ही किंवा YouTube वर पाहिला असेल तर आपल्याला सूचनेचे महत्व चांगल्या पद्धतीने समजेल. या कार्यक्रमात प्रयोगकर्ता प्रेक्षकातून एखाद्या व्यक्तीला स्टेज वर बोलावून त्याला काही मिनिटात संमोहन अवस्थेत नेतो. या प्रक्रियेत त्याचे बाह्यमन पूर्णपणे लुप्त होते आणि सगळा कारभार अंतर्मनाने चालतो.
प्रयोगकर्त्याने त्याला गोड चॉकलेट खायला दिले आणि सांगितले की ही कडू औषधाची गोळी आहे तर त्याला ती खरोखर कडू लागते. फुल्ल एसी लावून थंड केलेल्या रूममध्ये त्याला सांगितले की रूममध्ये खूप उकाडा आहे आणि तूला खूप गरम होतेय तर त्याला हळू हळू गरम व्हायला लागते आणि नंतर घाम सुद्धा येऊ लागतो. अंतर्मनाचा एक सिद्धांत आहे की, जो विचार अंतर्मनात जातो तो ते सत्य मानते आणि त्याप्रमाणे ती व्यक्ती वागू लागते. आपले बाह्य मन चूक की बरोबर असा तर्क करू शकते पण अंतर्मन जी माहिती मिळेल ते सत्य म्हणून स्वीकारते. ही झाली सूचनेची प्रगत अवस्था पण दैनंदिन जीवनातही आपण जाणते अजाणतेपणी चांगल्या वाईट सूचनांचे बळी पडत असतो.
एखाद्या शाळकरी मुलाला जर आपण चारचौघात सांगितले की हा मुलगा खूप आज्ञाधारक आहे आणि सांगितलेली सगळी कामे वेळेवर पूर्ण करतो. थोडेसे गुणगान केल्यामुळे या सूचनेचा त्याच्यावर लगेच परिणाम दिसून येतो आणि कोणीही काम सांगितले की तत्परतेने तो ते करतो कारण त्याला ती आज्ञाधारक ही प्रतिमा पुसून द्यायची नसते. एखादा मुलगा जर हुशार असेल आणि सगळीकडे त्याचे कौतुक होत असेल तर ती प्रतिमा टिकून ठेवण्यासाठी तो कायम प्रयत्नशील असतो.जरी त्याला अभ्यासाचा कंटाळा आला असला तरी कमी गुण मिळतील मग लोक काय म्हणतील या भीतीने तो परत जोमाने अभ्यास करू लागतो कारण त्याची जी हुशार म्हणून एक सामाजिक प्रतिमा असतें ती त्याला मलीन होऊन दयायची नसते.
याउलट एखाद्या मुलाला जर सतत म्हणत राहिले की तु काही कामाचा नाही, निव्वळ वेडपट आहेस तर तो या सूचना आपोआप तंतोतंतपणे पाळतो. त्याला सुधारण्याची इच्छा असूनही तो तसेच वागतो कारण त्याने स्वतःला मूर्ख समजून घेतलेले असतें आणि ती प्रतिमा तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो . मी असाच आहे, ही त्याच्या मनाची तयारी झालेली असतें, म्हणून पालकांनी आपल्या मुलांशी बोलताना किती जपून बोलावे हे लक्षात येईल.
एखाद्या स्त्रीला जर अनेकांनी सांगितले, की तू किती छान स्वयंपाक करतेस.. बस्स ही सूचना ती लगेच आमलात आणायला सुरवात करते आणि अजून चांगला स्वयंपाक करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. कारण ती प्रतिमा तिला जपायची असतें. सासूने जर सुनेबद्दल सगळीकडे चांगलेच सांगितले आणि सुनेलाही तसेच जर ऐकायला मिळाले तर ते एक उत्तम नाते तयार होऊ शकते कारण आदर दिला की आदर आपोआपच मिळतो पण सूचनेचे महत्व त्यातल्या कोणाला एकाला तरी समजने खूप महत्वाचे आहे.
आपल्या आसपास तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल, सोयरीक जमवताना जर एखाद्या मुलगा किंवा मुलीबद्दल जर लोकांनी चांगले सांगितले की ते लग्न जुळायला वेळ लागत नाही पण जर कोणी एखादे दोन शब्द जरी नकारात्मक सांगितले तर ऐकलेले खरे आहे की खोटे आहे हे सुद्धा लोकं तपासून पाहत नाही, लगेच तोंड फिरून मोकळे होतात. कारण इथे इतरांनी दिलेली माहिती ( सूचनांनी ) आपले काम चोखपणे केलेले असतें. एखादा व्यवहार होतानाही जर थोडेफार निगेटिव्ह ऐकले तर तो व्यवहार फिसकटू शकतो.
आजकाल इंटरनेटच्या जमान्यात Google review वाचून आपण एखाद्या दुकानाचे , हॉटेलचे, प्रॉडक्टचे मत बनवत असतो. काही नकारात्मक कॉमेंट्स असतील तर आपण तिकडे जाण्याचे टाळतो. म्हणजे इतरांनी दिलेल्या सूचनांचा आपल्यावर अप्रत्यक्षपणे परिणाम होत असतो.एखाद्या व्यक्तीला जर वारंवार सांगितले की तू छान दिसतोस किंवा दिसतेस तर ते या सूचनांची दखल घ्यायला लागतात आणि छान राहण्याचा प्रयत्न करतात. भले ते एवढे सुंदर दिसत नसतीलही पण त्यांना ते खरं वाटायला लागते.
माझा एक सहकारी होता तसा तो बोलण्यात थोडा खडुसच होता, त्याचा स्वभाव मला फार काही आवडत नव्हता. एक दिवस त्याच्या हनुवटीवर तीळ पाहून मी त्याला गमतीने म्हणालो, हनुवटीवर तीळ असणारी लोकं स्वभावाने खूप गोड असतात. हे ऐकताच तो इतका खूष झाला की त्याने आंनदाने मिठीच मारली. खरं खोटं काय आहे याचा त्याने विचारच केला नाही. माझे एक विधान ( सूचना ) त्याला खूप आनंद देऊन गेले.
एका कंपनीत माझा अजून एक दक्षिण भारतीय सहकारी होता 50 ते 55 वय असेल. सगळे त्याला आण्णा म्हणायचे . त्याची फिरकी घेण्यासाठी लोकं त्याला म्हणायचे “आण्णा, तुम बहोत अच्छा गाते हो एक गाना सुनावो “.हे ऐकताच आण्णा त्याच्या जाड्या भरड्या आवाजात रमैया वस्तावया हे गाणं म्हणायचा. आण्णाच्या गाण्याला काही सुर ताल नसायचा पण त्या लोकांच्या सूचनेचा त्याच्यावर इतका परिणाम झाला होता की त्याला खरोखर वाटायचे की आपला आवाज छान आहे. सूचनांमध्ये खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं करण्याची ताकत असते हे या उदाहरणावरून लक्षात येते.
पालकांनी मुलांशी संवाद साधताना चांगल्या सूचनांचा वापर केला पाहिजे. पती-पत्नी, सासू -सून, मुलगा – वडील, मालक – नोकर या प्रकारची नाती सुरवातीला चांगली असतात पण छोटया मोठया कारणांवरून एकमेकांबद्दल वापरलेल्या नकारात्मक सूचनांमुळे ( वक्तव्यांमुळे ) ती बिघडत जातात. याउलट बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल त्याच्यासमोर सतत सकारात्मक बोलने गरजेचे आहे. अशी आहे सूचनेची जादू. आपण समजून घेतली तर व्यवहारिक दृष्ट्या खूप फायदेशीर ठरु शकते.