ऑस्ट्रेलियातील Glen Innes या गावात कामानिमित्त काही दिवसांसाठी रहात असतांना तेथून जवळ असलेल्या Inverell या शहरात मला रोज जावे लागत असे . इन्व्हरल हे 1856 मधे एका नदीच्या काठावर स्थापन झालेलं गाव सिडनी पासून सर्वसाधारण 650 Km वर आहे. लोकसंख्या सोळा हजाराच्या आसपास असून याला जिल्ह्याचा दर्जा मिळालेला आहे. या शहराला सफायर सिटी म्हणजे नीलम रत्नांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. स्वच्छ हवा, प्रदूषणमुक्त, रहदारीमुक्त वातावरण आणि शांत असे हे शहर, वयस्कर लोकांचे आवडते गाव आहे .हल्ली सिडनी किंवा आसपासच्या मोठ्या शहरातील घरे विकून रिटायर्ड लोकं येथे घरं विकत घेऊन उर्वरित आयुष्य येथेच घालविने पसंत करतात.
या शहराची खासियत म्हणजे येथील मातीमध्ये,खाणीमध्ये नीलम sapphire, माणिक Ruby, पुष्कराज Topaz , असे अजून अनेक प्रकारचे मौल्यवान रत्ने सापडतात. यांचा वापर अनेक प्रकारच्या ज्वेलरी मध्ये केला जातो. 1970 च्या दशकात जगातली 75% नीलम रत्नाची पूर्तता या शहरातून होत होती. शहराच्या आसपास नदी, नाले, काही ठराविक जागेवर खोदले असता. कच्या स्वरूपात हे मौल्यवान खडे आणि खडक सापडतात. त्यावर मशीनने पॉलिशिंग आणि पैलू पाडून सुंदर अशी रत्ने तयार होतात.
आकार आणि कॅरेट यांवर किंमत ठरविली जाते. या शहरात अनेक ज्वेलरीची दुकानें आहेत तेथे सुटे खडे आणि खड्यांचा वापर केलेले दागिने पाहायला मिळतात आणि पैलू पाडण्याचे कामही तेथेच केले जाते. पर्यटक येथे खास fossicking चा अनुभव घेण्यासाठी येतात. fossicking म्हणजे कुदळ, फावडे, चाळणी घेऊन जायचे आणि माती उकरून ती चाळणीने चाळायची. माती चाळून मग त्यातून हे मौल्यवान खडे शोधायचे (खोद कामासाठी लागणारे सगळे साहित्य येथे भाड्याने मिळते).उत्कृष्ट दर्जाचे खडे दुकानदार चांगले पैसे देऊन विकत घेतात. तसेच येथे अनेक रंगीबेरंगी खडक आणि दगड ही भेटतात त्यांना व्यवस्थित कटींग आणि पॉलिश करून दुकानात विक्रीसाठी ठेवले जातात, लोक ते घरात डेकोरेशन साठी विकत घेतात.
येथे अन्नप्रक्रिया, मांस उत्पादन, दूध उत्पादन शेतीसाठी लागणारी यंत्रे यांच्या संबंधित काही उद्योगधंदेही आहेत. आसपासच्या परिसरात भरपूर शेती पाहायला मिळते. गहू, सूर्यफूल, मका, बार्ली, ओट्स, मायलो ( लाल ज्वारी ) अशी अनेक पिके शेतकरी घेतात. काही ठिकाणी फक्त मोकळी, गवताळ कुरणे पाहायला मिळतात आणि त्यात गाई किंवा मेंढ्या पाळलेल्या असतात. दिवसभर ही जनावरे चरतात, शेतातील तळ्यातच पाणी पितात आणि रात्री तेथेच मुक्काम करतात. गोठा वैगरे हा प्रकार कोठे पाहायला मिळत नाही . शेताच्या कडेने तारेचे कंपाउंड असते त्यामुळे जनावरं बाहेर कोठे जात नाहीत.
असेच एकदा रस्त्यात एक वयस्कर माणूस भेटला अगदी सरळ साधा माणूस होता.बोलता बोलता म्हणाला माझी 7000 एकर जमीन आहे. चार हजार एकरात शेती करतो आणि तीन हजार एकरात गाई पाळल्या आहेत. पण तो आता शहरात राहतो आणि त्याची 3 मुले सगळी शेती पाहतात. शेत कामासाठी मजूर मिळणे खुप अवघड असतें त्यामुळे सगळी शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते .हे सगळे ऐकून मी तर अवाकच झालो.
याच शहरात कामानिमित्त एका दुकानात जाणे झाले. मेंढ्यांच्या लोकरीपासून बनविलेले कपडे, बूट, चपला, स्वेटर यांचे ते दुकान होते. दुकानदार स्त्री म्हणाली त्यांची 7500 एकर जमीन आहे पण फक्त चराऊ जमीन म्हणजे कुरण आहे. त्यात त्यांनी 300 गाई आणि 4000 मेंढया पाळलेल्या आहेत. लोकर आणि मांस उत्पादनासाठी ते मेंढ्या पाळतात. तिचा भाऊ आणि ती सगळी याची देखभाल करत असतात. इन्व्हरल या शहराच्या आसपासच्या खेड्यांमध्ये काही Aboriginal ( मूळचे आदिवासी लोक ) पण बऱ्याच प्रमाणात आहेत. एक खुप मोठे धरण या शहराला पाणीपुरवठा करते तसेच जंगल, खाणी, धबधबे, आणि विस्तीर्ण शेती यामुळे या शहराचा परिसर खुप सुंदर दिसतो .