गेल्या आठवड्यात आम्ही सिडनी जवळच्या एका फार्म ला भेट दिली, अंदाजे 5-6 एकारात हे फार्म असेल. दोन तीन प्रकारच्या सूर्यफूलांचे प्लॉट पहायला मिळाले आणि थोडीफार गव्हाची शेती होती. फार्म तसें छोटेच होते कारण याआधी आम्ही 100 – 200 एकरात सूर्यफूल शेती पहिली होती पण या फार्मचे मला थोडे विशेष वाटले. कारण.शेती मालकाने स्वतःच्या फार्मची वेबसाईट बनविली होती. Facebook वर त्यांच्या फार्मच्या नावाने एक पेज पण आहे त्यावर 21 हजार लोकं कनेक्ट आहेत. प्रत्येक सीजनच्या पिकाचे फोटो ते फेसबुक ला टाकत असतात त्यामुळे हौसी लोकं शेती पहायला जातात. ज्याला माहित नाही त्यांनाही माहिती होते.
आम्हाला पण हे फार्म माहित नव्हते पण फेसबुक चाळता चाळता ती जाहिरात मला एकदा दिसली आणि आम्ही तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. साधारण एक तासात आम्ही तिथे पोहचलो. मेन रोडवर त्या फार्मचा सुंदर बोर्ड लावला होता. आत मध्ये फार्म कडे जाण्यासाठी एक छोटा रस्ता होता. एक मुलगा तिथे दिवसभर उभा राहून आलेल्या लोकांना गाडी पार्क कुठे करायची ते सांगत होता. छोट्या रस्त्याने आत गेल्यावर एक छोटी केबिन होती तेच त्यांचे ऑफिस होते. तिथे आम्ही तिकिटे काढली.
फार्म पहायला तिकीट होते आणि सूर्यफूल तोडून घरी न्यायचे असेल तर त्याला ही पैसे होते. फुलं कटींग करण्यासाठी ते एक खास प्रकारचे कटर देत होते. बऱ्याच वेळा लोकं फार्म पहायला कमी आणी फोटो काढायलाच जास्त येतात असे माझ्या लक्षात आले. साधारण 40 मिनिटात आमचे सगळे पाहून झाले असतें पण फोटो काढता काढता आमचा 1 तास कधी निघून गेला ते कळलेच नाही. फार्मवरच एका शेड मध्ये ते मकाची कणसे उकडून त्याला लोणी, आणि मसाला लावून विकत होते.
तिथे आधीच वेटींग होते, आम्हाला मकाची कणसं मिळेपर्यंत थोडी वाट पहावी लागली आणि आसपास बसायला खुर्च्या पण ठेवलेल्या होत्या. प्रवेश फी, मकाची कणसं, काही शेती प्रॉडक्ट, फुलं, आणि शेवटी शेती उत्पादन अशा अनेक मार्गाने त्यांना उत्पन्न मिळत होते. मला त्या शेतकऱ्याची कल्पकता आवडली . फार्म तसें काही विशेष नव्हते पण त्यांनी ते विशेष करून लोकांपर्यत पोहचविले हे महत्वाचे आहे.
मग सहज डोक्यात विचार आला की आपल्या इकडे भारतात सुद्धा भविष्यात अशा गोष्टींना भरपूर वाव आहे.आपल्या लोकांना खेड्यात शेती करणे दिवसेंदिवस महाग होत चाललें आहे. मजूर न मिळणे, अवकाळी पाऊस, रोगराई, बाजारभाव न मिळणे, शेतकरी मुलाला मुली न मिळणे वैगरे वगैरे. कांदा पीक पण आत्ता भरवशाचे राहिले नाही. अजून दहा वर्षांनी ग्रामीण भागात शेती करण्याचे प्रमाण अजून कमी होईल पण शहरी लोकांचे शेती आणि ग्रामीण जीवनाबद्दलचे आकर्षण वाढतच राहील.
शहरातील लोकं दर शनिवार रविवार बाहेर पडायला पहात आहे त्यामुळे भविष्यात farm visit, farm stay, farm party, farm camping चुलीवरचे जेवण, कृषी पर्यटन, अशा गोष्टींची मागणी वाढतच राहील. शेतात जर विविध फळांची बाग केली आणि काही नारळ, चिक्कू, केळी, आकर्षक फुलझाडे लावली तर शेत सुंदर दिसेल. शिवाय सूर्यफूल, झेंडू, शेवंती, ऊस, अशी थोडी पिके घेत रहायची कारण आजकाल लोकांना फुलं तोडायला आणि फोटो काढायला जास्त आवडते. शेतात टॉयलेट बाथरूम असेल तर लोकं तिथे राहायला पण तयार होतील. अनेकजण Tent (तंबू) लावून मुक्काम करू शकतील शिवाय हुरडा पार्टी, हरबरा पार्टी, जेवणाची पार्टी अशा अनेक गोष्टी होत राहतील..
शहरातल्या लहान मुलांसाठी गाईच्या धारा काढणे, कोंबड्याच्या खुराड्यातून अंडी काढणे, शेततळ्यातून फिशिंग करणे , घोड्यावर बसने, पतंग उडविणे, ट्री हाऊस, झोका, अशा गोष्टी करता येऊ शकतील आणि मुलं या गोष्टी आवडीने करतात. फक्त कल्पकता, जाहिरात, सोशल मीडिया यांचा वापर करणे गरजेचे आहे. एकदा नाव झाले की लोकं शोधत येतील. आज नोकरी करत असाल तर काही वर्षात तुम्ही रिटायर होणार किंवा शेतकरी असाल तर त्या वयात काम करणे जड जाईल.आपल्या शेतीचा जर कल्पकतेने वापर केला, आजच झाडं, फळबागा लावल्या तर पाच ते दहा वर्षांनी वरील कल्पना राबवता येईल.
फळबागेला राब पण कमी असतो आणि उत्त्पन्नही अनेक वर्ष मिळते. जोडीला फळ प्रक्रिया उद्योग करता येऊ शकतो. फार्म वर छोटे कार्यक्रम, फोटो शूट पण करता येऊ शकतात. बागकामासाठी शहरातल्या लोकांना शेणखत लागते. सुकलेल्या शेणखताच्या छोट्या पिशव्या पॅकिंग करून विकता येऊ शकते. शेतीच्या आसपास तलाव, नदी, ओढा, डोंगर असेल तर त्याचा कल्पकतेने उपयोग करून कृषी पर्यटनातून अजून उत्पन्न वाढवता येईल. हायवे किंवा शहाराजवळ असलेली शेती या कामासासाठी अजून फायदेशीर ठरू शकते. एखाद्या गरीब शेतकऱ्याकडे जमीन असेल पण हे सगळे करायला पैसे नसतील अशा वेळेस एखादा गुंतवणूकदार तिथे भागीदार होऊ शकतो.
पुढची पिढी शेती करणारच नाही पण त्यांना ग्रामीण जीवन आणि शेती यांचे आकर्षण मात्र कायम राहील. फक्त गरज आहे आपली शेती इंटरनेटवर नेण्याची आणि थोडया कल्पकतेची..