होय, झाडांनाही भावना असतात , Yes , Plants have feelings . भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोग करून सिद्ध केले होते की वनस्पतींनाही भावना असतात . झाडांनाही भीती, प्रेम, दया, राग या गोष्टी कळतात. पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक औषधें बनविणारे वैद्य, एखादे औषध बनवायचे असल्यास आधी जाऊन झाडाला गंध अक्षदा लावून आमंत्रण देत असत आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा शुभ मुहर्तावर त्या झाडाची फांदी किंवा पाला घेऊन येत असत .
जुनी लोकं अजूनही रात्रीच्या वेळी झाडावरची फळे फुले तोडत नाही कारण झाडं झोपलेली असतात आणि उगीच त्यांना त्रास देणे चांगले नसते. अध्यात्मात उच्च कोटीला पोहचलेल्या योग्यांना तर झाडांमध्येही आत्मे दिसतात आणि त्यांच्याशी ते संवाद साधतात त्यांच्या अडचणीही कळतात परंतु सर्व सामान्य माणसाकडे ती दिव्य दृष्टी नसल्यामुळे आपण सर्वजन त्याविषयी अनभिज्ञ असतो. कोकणी माणूस तर झाडांवर खूप प्रेम करतो. झाड कितीही मोठे होऊ दे, ते झाडाला खत पाणी घालून त्याची निगा राखतात. काहीजण तर झाडांशी प्रेमळ संवाद साधतात, गप्पा मारता आणि वेळेवर फळे नाही दिली तर रागवतात पण.
तारे जमीन पर हा हिंदी चित्रपट तुम्ही पहिला असेल तर त्यात अमीर खान सांगतो की, आफ्रिकेतील एक जमात एखादे झाड जर तोडायचे असेल तर ते कुर्हाडीने तोडत नाहीत. दररोज त्या झाडाजवळ जाऊन त्याला अपशब्द, तिरस्कारयुक्त भाषा बोलतात आणी काही दिवसांनी ते झाड सुकून जाते. एक प्रकारे ते मरणच पत्करते कारण झाडांनाही भावना असतात.
अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ् लुथर बरबँक यांनी वनस्पतींवर अनेक प्रयोग केले आणी निरनिराळ्या वनस्पतींचा शोध लावला. वाळवंटातील नागफणी नावाची एक काटेरी वनस्पती त्यांच्या बागेत होती. ते नेहमी त्या झाडाशी संवाद साधत असत. “स्वसंरक्षनासाठी तुला वाळवंटात काट्यांची गरज असते पण येथे तुला त्याची गरज नाही. तुझे संरक्षण मी करेल, तू कसलीही चिंता करू नकोस ” कालांतराने तेथे काटेविरहित नागफणी वनस्पती तयार झाली आणि अमेरिकेच्या वातावरणात ती चांगलीच रुजली.
असाच माझा एक अनुभव सांगतो. माझ्या गार्डन मध्ये एक दहा वर्षाचे एक आंब्याचे झाड आहे. सहा वर्षांपासून त्याला फक्त मोहर येऊन, गळून जात असे . फक्त एकदाच एक मोठा आंबा आला होता, नाहीतर दरवर्षी निराशाच पदरी पडत असे. मग मी ठरविले की आपण आंब्याच्या झाडाशी संवाद साधून बघू काय होते ते.आठवड्यातून एकदा पाणी देताना त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याला सांगत असे ” अरे किती मोठा झालास.. खत, पाणी सगळे काही तुला वेळेवर मिळते तरी आंबे का देत नाहीस? “तुझ्यापेक्षा छोटी झाडें फळं देतात आणि तुला काय अडचण आहे? यावर्षी तू आम्हांला आंबे देशील अशी मी अपेक्षा ठेवतो. ” जेव्हा, जेव्हा मी बागेत जात असे तेव्हा मी त्या आंब्याच्या झाडाशी संवाद साधत असे.
मला पण विश्वास वाटत होता की यावर्षी आंबे नक्कीच येतील आणि खरोखर, त्यावर्षी खूप मोहोर आला, खूप कैऱ्या लागल्या, काही दिवसांपूर्वी गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे बऱ्याच कैऱ्या पडून गेल्या होत्या पण 3 मोठेआंबे मात्र टिकून राहिले आणि आंब्याच्या झाडाने त्याचे वचन पाळले. आता हेच आंब्याचे झाड दरवर्षी आम्हाला फळे देते . तीन आंब्याने झालेली सुरुवात आता ते झाड पंधरा-वीस आंबे तर नक्की देते आणि प्रत्येक वर्षी त्यात भर पडत आहे. फळं, फुल न येणाऱ्या झाडांशी संवाद साधून पहा. ते नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील, फक्त मनापासून प्रयत्न करायला हवे.