ऑस्ट्रेलियामधील आदिवासी लोकं हे लाकडी शस्त्र वापरतात की जे फेकल्यानंतर परत माघारी येते, त्यालाच ते बूमरॅंग ( Boomerang) म्हणतात. तेथूनच हा शब्द सगळीकडे प्रचलित झाला. आपला एखादा विचार, मुद्दा किंवा डाव जेव्हा आपल्यावरच पलटतो त्याला आपण बूमरॅंग झाले असे म्हणतो..दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण एखादा चांगला किंवा वाईट विचार दुसऱ्यांबद्दल करतो तोच विचार किंवा परस्थिती आपल्यावर येत असतें आणि हा वैश्विक नियम आहे. जे पेराल तेच उगवते हे आपण नेहमी ऐकत आलेलो आहे. दुसऱ्याबद्दलचे वाईट विचार आणि ऊर्जा आपल्यावरच बूमरॅंग होत असतें. भले कोणाबद्दल चांगले विचार करू नका पण वाईट तर नकोच नको, कमीतकमी न्यूट्रल तरी रहा.
जर आपण एखाद्याला प्रेम आणि आनंद दिला तर त्याच्याकडूनही आपल्याला तेच मिळते. राग आणि द्वे्षाच्या बदल्यात तेच मिळणार. येथे जी गोष्ट द्याल तीच तुमच्याकडे परत येत असतें. समोरच्याला नमस्कार केला तर तो नमस्कारच करणार आणि शिव्या दिल्या तर शिव्याच मिळणार. एवढेच काय तर लग्नसमारंभात जितक्या रकमेचे गिप्ट किंवा आहेर कराल तेवढ्याच तोलामोलाचे गिप्ट तुम्हाला परत तुमच्या कार्यक्रमात मिळत असतें..गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शेवट तसाच होतो जसे ते इतरांशी वागतात. एखादी व्यक्ती जर तुमच्याविषयी पाठीमागे वाईट वागत असेल किंवा बोलत असेल तरी पण त्याला माफ करून त्याच्या विषयी चांगली आशीर्वचने बोलत रहा. तसें पाहिले तर असे वागणे एवढं सोपे नाही पण प्रायोगिक तत्वावर करून पाहायला काय हरकत आहे. प्रयत्न करून पहा आणि आश्चर्य नक्की अनुभवा .
दुसऱ्यांच्या मुलामुलींना नावे ठेवणारी लोकं तुम्ही पाहिली असतील पण यांचीच मुले पुढे जाऊन तसें वागताना दिसतात किंवा चर्चेचा विषय बनलेली उदाहरणे आहेत…. घटस्फोट, प्रेमातील फसवणूक, व्यवहारात केलेली लबाडी, जाणूनबुजून केलेली बदनामी, अशा अनेक गोष्टीं जर तुमच्याबाबतीत झाल्या असतील तर त्या व्यक्तीला समज दया , झालेली चूक समजावून सांगा आणि त्याच्या आयुष्यातून बाजूला व्हा. त्या व्यक्तीला परत शिव्या शाप देत बसू नका नाहीतर तेच विचार तुमच्यावर बूमरॅंग होतील आणि त्याच त्याच गोष्टीं तुम्हाला परत परत अनुभवायला मिळतील.
या उलट त्यांना यश, समाधान, शांती मिळू दे अशी वाक्य मनापासून बोलत रहा, परिणामी त्यांची वाईट कर्मे त्यांच्यावर बूमरॅंग होऊन त्यांना कधी ना कधी त्याची शिक्षा होईल आणि तुमचे त्यांच्याविषयी असलेले चांगले विचार तुमच्यावर बूमरॅंग होऊन तुम्हांलाच त्याचा फायदा होईल. म्हणजेच प्रत्येकाला आपल्या वैचारिक ऊर्जेप्रमाणे अनुभव येत असतात. या गोष्टी वर वर पाहता पटणार नाहीत पण सूक्ष्मरित्या त्या घडत असतात आणि कालांतराने त्याचे परिणाम पाहायला मिळतात.
एका व्यक्तीला त्याच्या कंपनीत सुपरवायजर खुप त्रास द्यायचा, रजा मंजूर न करणे, अवघड काम देणे, ओव्हरटाईम न देणे, कामात चुका काढणे इत्यादी. त्याला सांगितले, तू आधी त्याच्याविषयी वाईट विचार करणे बंद कर आणि उद्यापासून असा विचार कर की तू चांगला माणूस आहेस..तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो….. तुला आयुष्यात सुख शांती लाभो वगैरे वगैरे.. काही दिवसांनी तो व्यक्ती सांगू लागला की सुपरवायजर खुप सुधारला आहे. तो आता त्रास देत नाही..
बऱ्याच वेळा एखाद्याचे दुकान किंवा धंदा चांगला चाललेला असतो आणि एकदिवस दुसरा कोणीतरी येऊन शेजारी किंवा समोर तशाच प्रकारचे दुकान टाकतो. त्यावेळेस त्याच्या नावाने बोटे मोडणे किंवा त्याची बदनामी करू नका, तसें करून परस्थिती बदलणार नाही. आणि तसें करत असाल तर तो तुमच्यापेक्षा वरचढ आहे असे तुम्ही समजता….आणि स्वतःला कमी लेखू लागता. परिणामी हळू हळू तुमचा व्यवसाय कमी कमी होत जातो, कारण तशी ऊर्जा तुम्ही विश्वात पाठवत असता. परस्थिती बदलणे तुमच्या हातात नसते अशावेळेस टिकून रहा आणि प्रगतीचे, भरभराटीचे विचार त्याच्याकडे पाठवा. ते दुकान कदाचित दुसरीकडे जाऊन प्रगती करेल किंवा तुमच्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही. कदाचित तुम्ही दुसरीकडे जाऊन अजून जास्त प्रगती कराल. पण हे मनापासून करायला हवे.
बूमरॅंग चा नियम समजावून घ्या, प्रयोग करून पहा, अनुभव घ्या, किंवा कोणाचाही भूतकाळ आठवा बूमरॅंगच्या नियमाने बऱ्याचदा तेथे काम केलेले दिसून येईल.