मन का हुआ तो अच्छा, नही हुआ तो और अच्छा, क्योंकी वो भगवान के मन का होता है

पुण्यात तरुणांसाठी ( अंदाजे 1996-97) साली गणेश कला क्रीडा मंच येथे त्यावेळच्या शिवसेना सरकार तर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचे नावच ( जिगर 2000) असे होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचलेल्या प्रसिद्ध व्यक्तींकडून तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी दररोज दोन वक्त्यांची भाषणं होत असत . आशा भोसले, सुनील गावसकर, नीलकंठ कल्याणी, बी जी शिर्के, डी एस कुलकर्णी, राहुल बजाज, अमिताभ बच्चन, बाळासाहेब ठाकरे असे अनेक मान्यवर त्या व्यासपीठावर येऊन गेले, त्यापैकी अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे माझ्या चांगलीच स्मरणात राहिली.

लहानपणी शाळेत असताना ऐन वेळी आजारी पडल्यामुळे भरपूर सराव करूनही शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग न घेता आल्यामुळे अमिताभ खूप नाराज झाले होते. अमिताभ बच्चन यांना त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी वरील वाक्याचे महत्व पटवून सांगितले आणि त्यांची समजूत घातली होती की ” मनासारखं झाले तर चांगलच पण नाही झाले तर अजून चांगले कारण ती ईश्वराची इच्छा असते.”

पुढे काही वर्षांनी अमिताभ यांना ऐन उमेदीच्या काळात एका प्रसिद्ध चित्रपट कंपनीच्या ऑफिस बाहेरूनच हाकलून लावण्यात आले होते आणि त्यांची उंची आणि आवाजाची खिल्ली उडविण्यात आली होती . त्या वेळेस नाराज न होता त्यांनी स्वतःची समजूत घालण्यासाठी वडिलांनी सांगितलेले हेच वाक्य आठविले आणि कठीण परिश्रमाला सुरवात केली. काही चित्रपट हिट झाल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कालांतराने त्याच निर्मिती कंपनीने त्यांना चित्रपटात काम करण्याविषयीं विचारले होते . जो आवाज आणि उंची लोकांना विचित्र वाटत होती नंतर त्याच गोष्टींचे लोकं आता चाहते झाले आहेत..

थोडक्यात काय तर , अनेक वेळा आपल्याला पाहिजे तसें घडत नाही, आपण नाराज होतो पण त्यामागेही ईश्वरी इच्छाच असतें. ती गोष्ट घडताना आपल्याला पटत नाही, आपल्यावर अन्याय होतोय असे वाटते, हे आपल्याच वाटयाला का असाही प्रश्न पडतो. पण काही वर्षांनी पाठीमागे वळून पहिल्यानंतर कळते, अरे खरंच की, जे झालं ते चांगलच झालं. प्रत्येक घटना ही एकमेकांशी संबंधित असतें आणि नंतर त्यांची एक मालिकाच आपल्या आयुष्यात तयार होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकतांना पण वरील वाक्याचा अनुभव आला. त्याकाळी मॅट्रिक पास झाल्यावर सरकारी नोकरी लागत असे. घरच्या गरीब परस्थितीमुळे त्यांना परीक्षा फी भरता आली नाही त्यामुळे ते परीक्षेला बसू शकले नाही, विशेषतः त्यांच्या आईला त्याचे खूपच वाटले होते. परिणामी त्यांना शिक्षण सोडून साधी नोकरी करावी लागली. चित्रपटांचे पोस्टर रंगविण्याचे ते काम करत असत.

पुढे जाऊन त्यांनी शिवसेना स्थापन करून मुंबईमध्ये मराठी माणसाच्या हक्कासाठी लढले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन नाव उदयास आले . त्यांनी सांगितले की मी जर मॅट्रिक पास झालो असतो तर आज सरकारी नोकरीतून निवृत्ती घेऊन पेन्शन खात बसलो असतो, पण महाराष्ट्र शिवसेना आणि बाळ ठाकरेंना मूकला असता. परीक्षेला न बसता येणे ही त्यांच्या साठी आणि कुटुंबासाठी वाईटच गोष्ट होती पण ती ईश्वरी इच्छा होती, कारण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

टाटा घराण्यात एका स्त्रीला कॅन्सर झाला होता. त्याकाळी भारतात कॅन्सर वर उपचार करण्याची सोय नव्हती, परिणामी त्यांना परदेशात जाऊन उपचार घ्यावे लागले. त्यांना कळून चुकले की जर आपली ही अवस्था होते तर सामान्य जनतेचे काय हाल होत असतील आणि पुढे मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटल चा जन्म झाला . येथे त्या स्त्रीला कॅन्सर होणे हे वाईटच होते पण ईश्वरी संकल्प काही वेगळाच होता, सर्वसामान्य जनतेसाठी हॉस्पिटल तयार व्हावे हीच नियतीची इच्छा होती.

आपल्या आयुष्यात एकदा डोकावून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की, पूर्वी ज्या वाईट गोष्टी घडून गेल्या त्या आज तुम्हाला चांगल्या वाटतील.आणि खात्री पटेल “जो हुआ वो अच्छा हुआ क्योंकि, वह भगवान के मन का था” . तुम्हाला काय चांगले वाटते किंवा आवडते त्यापेक्षा, तुमच्यासाठी काय योग्य आहे हे ईश्वर ठरवत असतो..

तुमचा झालेला अपमान, कोणीतरी खो घालून मोडलेला व्यवहार, जमवून मोडलेलं लग्न , प्रवासात चुकलेली गाडी भागीदाराने व्यवसायात केलेली फसवणूक अशा अनेक गोष्टींतून पुढे चांगलेच घडत असते परंतु आपला पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक हवा. वाईट गोष्टीं घडून गेल्यानंतर एकतर तुमची प्रगती तरी होते किंवा वाईट कर्माची शिक्षा मिळून तुम्ही त्यातुन मुक्त तरी होता , कारण तसें व्हावे हे देवाच्याच मनात असतें. तुमच्यावर अन्याय कधीच झालेला नसतो.

अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा तुमच्यासाठी वाईट घटना असेल पण त्या व्यक्तीसाठी मुक्तीचे द्वार उघडले गेले असेल किंवा प्रारब्ध भोग आणि तुमचा ऋणानुबंध संपवून त्यांच्या नवीन जीवनाची सुरवात असेल पण आपण जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून ईश्वरालाच दोष देत बसतो. प्रत्येकाला आपापल्या लायकी प्रमाणे मिळत असतें, दुसऱ्या बद्दल असुया बाळगण्यात काहीच अर्थ नसतो . ईश्वराचे प्लॅनिंग परफेक्ट असतें तिथे शंका घेण्यात काहीच अर्थ नसतो. शेवटी जे होते ते चांगल्यासाठीच होत असते.