भाग्य | LUCK

भाग्य ( Luck ) हे प्रत्येकाच्या पूर्वजन्माच्या कर्मफला ठरले जाते. जन्म कुंडलीतले नववे स्थान, भाग्य स्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानातील ग्रह, राशीं, भाग्य स्थानाचा स्वामी आणि भाग्य स्थानावर असणाऱ्या इतर ग्रहांच्या दृष्टी यावरून त्या व्यक्तीच्या भाग्याचे आकलन होते. प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वास्तू, वनस्पती, शहर, देश यांना आपापले भाग्य ( Luck) असतें आणि भाग्य हे काही काळानंतर बदलत असतें.

काहींचे भाग्य हे लहानपणीच उदयास येते तर काहींचे तरुणपणात, काहींचे मध्यम वयात तर काहींचे उतार वयात उदयास येते. पूर्व पुण्याई जो पर्यंत आहे तो पर्यंत भाग्य जोरदार असतें, हात लावीन त्याचे सोने होते. योग्यता नसतानाही काही माणसं यशाच्या शिड्या चढतांना दिसतात.  जर भाग्याची साथ नसेल म्हणजेच पूर्वपुण्याई नसेल तर हुशार आणि अनुभवी माणसंही संघर्ष करताना दिसतात. जसे प्रत्येक श्वासागणिक आपले आयुष्य कमी होत असतें त्याच प्रमाणे सुखाच्या प्रत्येक घासाबरोबर पुण्याईचा क्षय होत असतो. पुण्याई संपताच माणसाला उतरती कळा लागते आणि अडचणी वाढत जातात किंवा परिस्थितीत अजिबात सुधारणा होत नाही. त्यामुळे माणसाने पुण्यकर्म करत राहिले पाहिजे.

श्रीमंती, मध्यमस्थिती आणि गरिबी हे एक चक्र आहे. तेथून पुढे परत गरिबी, मध्यमस्थिती आणि श्रीमंती असे हे कालचक्र प्रत्येक घराण्यात येत असतें, हे चक्र पूर्ण व्हायला शेकडो वर्ष जातात. हा एक कालचक्राचा नियम आहे पण जर घराण्यातील एखाद्या पुरुषाने खूप पुण्य, दानधर्म,जनकल्याण केले तर पुढील पिढीसाठी येणारी गरिबी किंवा वाईट काळ अनेक वर्षे लांबला जातो. जितके जास्त पुण्य तेवढी जास्त वर्ष पुढील पिढी सुखात नांदत असतें. थोडक्यात सांगायचे म्हणजे, तसेच पुण्यवान आत्मे त्या घरात जन्म घेत असतात. आपण पहिले असेल की बऱ्याच घराण्यामध्ये आजोबाच्या काळात खूप श्रीमंती असतें, नंतर मुलांच्या काळात मध्यम स्थिती येते आणि नातवंडे अगदी गरिबीत जगत असतात. याचे कारण म्हणजे घराण्यात कोणी पुण्य किंवा समाज उपयोगी कार्य केलेच नाही तर मग उतरती कळा लागणारच..

कोणे एके काळी काही जाहगीरदार, पाटील, देशमुख, घराणी खूप सुखवस्तू आणि श्रीमंत होती पण त्यांची आजची पिढी हालाखीत दिवस काढतांना दिसते कारण ते भाग्याचे चक्र आहे. श्रीमंती नंतर गरिबी येतेच परंतु पुण्यकर्म त्याला रोखू शकते. कधी कधी एखाद्या घराण्यात मध्येच एखादा पुण्यवान आत्मा जन्म घेतो, त्या घराण्याचे नाव मोठे करतो आणि तेथून त्या घराण्याचे नशीब पालटते.

मुघल साम्राज्य, आदिलशाली, कुतुबशाही, निजामशाही अशा अनेक राजघराण्यांनी भरपूर सत्ता उपभोगली आहे, पुण्य तर सोडाच पण अनेक विध्वंसक कृत्ये त्यांच्याकडून केली गेली . पूर्व पुण्याईमुळे त्यांच्या काही पिढ्या सुखात गेल्या पण आज त्यांचे वंशज पाहायला पण मिळत नाही आणि असलेच तर खूपच हालखीत जगत असतील.

शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड, महादजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर, राजश्री शाहू महाराज, टाटा, बिर्ला, या सगळया घराण्यांनी सत्ता आणि श्रीमंती उपभोगली आहे आणि अजूनही त्यांचे वंशज श्रीमंती उपभोगत आहे यामागे एकच कारण म्हणजे त्यांनी केलेली अफाट पुण्याई आणि जनकल्याण हेच होय .दैवीशक्ती आणि नियतीही अशाच लोकांना साथ देत असतें कारण त्यांच्या मार्फत अनेक लोकांचे कल्याण होत असतें. त्याची उदाहरणं म्हणजे अनेक संकटातून वाचलेले शिवाजी महाराज आणि आजच्या घडीला म्हणाल तर अनेक चढ उतार पाहिलेला टाटा ग्रुप. स्वातंत्र्य काळानंतर भारत उभारणीमध्ये मोलाची कामगिरी या कंपनीने केली. श्रीमंती पेक्षा यांचे दातृत्वच महान आहे.

एके काळी भारतभर पसरलेलं मुघल साम्राज्य हळू हळू इतिहास जमा होत गेले,लोकांना त्यांचा विसर पडत गेला. ग्रीकचा राजा अलेक्झांडर, फ्रान्स चा बादशाह नेपोलियन, जर्मनीचा हुकूमशहा हिटलर ही लोकं जगात आली आणि गेली. जग फक्त त्यांना इतिहासामुळे ओळखते, सत्ता उपभोग सोडला तर विशेष कामगिरी त्यांच्याकडून झालीच नाही. आज त्यांचे वंशज कोठे आहेत? पश्चिम महाराष्ट्रातील एका छोट्या राज्यातले शिवाजी महाराजांसारखे वीर पुरुष आपल्या कर्मामुळे जगभर प्रसिद्ध होत आहे आणि दिवसेंदिवस हा आलेख वाढतच आहे. “जय भवानी जय शिवाजी” ही घोषणा आज एक प्रेरणा स्त्रोत बनलाय.

आपण जे देतो तेच परत आपल्याकडे येत असतें हा सृष्टीचा नियम आहे. अनेक पुण्य कर्मापैकी दान हे एक चांगले कर्म आहे. एखाद्या गरीबाने दिलेले शंभर रुपायाचे दान आणि श्रीमंताने दिलेले लाखाचे दान यांची उत्पन्नानुसार टक्केवारी पहिली तर ती कदाचित सारखीच भरू शकते. म्हणून आपण केलेल्या दानाला कधीच लहान समजू नये . तुमच्या उत्पनाच्या टक्केवारी नुसार दानाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या करोडपतीबरोबरही बरोबरी करू शकता. येथे पैशाचे आकडे महत्वाचे नसून तुमच्या उत्पनातून किती टक्के दान करता याला महत्व आहे. त्यासाठी, सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमविण्यापेक्षा, सात पिढ्या बसून खातील असे पुण्य कमवायाला हवे आणि तें पुढच्या पिढीलाही शिकविले गेले पाहिजे.