दैनंदिन जीवन जगताना आपण माणसं खुप धावपळ करत असतो. बऱ्याच वेळेला प्रकृतीची हेळसांड करून किंवा अनेक प्रकारचे त्याग करूनही काहीजण जगत असतात, कारण काय तर आज त्रास काढला तर उद्या चांगले दिवस येतील अशी त्यांची धारणा असतें. कंपनी क्षेत्रात असताना खूप ओव्हर टाइम करणारी काही लोकं मी पहिली आहेत. दररोज 16 तास काम करून त्यांच्या कमरेला अक्षरशः पट्टे लागले होते, तर काही आजारी पडेपर्यंत काम करायचे. काहींच्या तर मुलांबाळांची भेट आठवडा,पंधरा दिवस होत नसे. दररोज दोन शिप्ट केल्यामुळे त्यांचा जास्त वेळ कंपनीतच जात असे आणि घरी गेल्यावर मुलं झोपलेली असायची. या त्यागाच्या बदल्यात महिन्याच्या शेवटी मात्र यांना भरभक्कम पगार मिळायचा.
पेमेंट स्लिप पाहूनच खूष व्हायचे ते. तेव्हा वाटायचे ही लोकं खूप पैसा कमावतात,अगदी हेवा वाटायचा त्यांचा. काहीवर्षांनी मागे वळून पहिल्यानंतर असे लक्षात आले की यांच्यात आणि इतर कामगारांत आर्थिक दृष्ट्या खूप मोठा फरक झालेला दिसत नाही, पण त्यांच्या शरीराची हानी मात्र झालेली होती . असेच काम करत करत दिवस निघून जातात, वय वाढत जाते पण आपण स्वतः साठी जगायचे विसरूनच जातो. बारीक विचार केला तर असे वाटते 90 % जीवन आपण दुसऱ्यांसाठीच जगत असतो.
Last Holiday या इंग्रजी चित्रपटातली नायिका एक सर्वसामान्य आयुष्य जगत असते. सततच्या कामामुळे ती स्वतःसाठी जगणेच विसरून गेलेली असते. मोठी सुट्टी घेणे तिला परवडतच नसते. पण एक दिवस अचानक तिला असाध्य रोग झाल्याचे निदान होते आणि ती पूर्णपणे हादरूनच जाते आणि मग ठरवते आता सुट्टी घ्यायची आणि बचत केलेले पैसे खर्चून मस्त एन्जॉय करायचा. ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिल्यात त्या सगळ्या करून घ्यायच्या कारण असे ना तसें आपण मरणारच आहोत..ठरविल्याप्रमाणे सगळे काही करून झाल्यावर तिला कळते की तो मेडिकल रिपोर्ट चुकीचा होता. पण या घटनेमुळे तिला जीवन जगण्याचा अर्थ मात्र कळाला, आपले जीवन किती अमूल्य आहे ते तिला कळून चुकले.
ही जरी चित्रपटातली कहाणी असली तरी आपल्या दैनंदिन जीवनाशी ती बरीच जवळीक साधणारी आहे. बऱ्याच जणांची तिच्या सारखीच अवस्था आहे, काम करण्याच्या नादात जगणेच विसरून गेलेले असतात..जेव्हा वय निघून जाते आणि रिटायरमेंट येते तेव्हा अनेक गोष्टीं करण्यातली आवडही निघून गेलेली असतें, मग ऐकायला मिळते आता काय.. वय झालय आपलं.. त्या वयात अनेक व्याधी जडलेल्या असतात, काहींचा जीवनसाथी सोडून गेलेला असतो आणि मग कशातच रस उरलेला नसतो म्हणून जे काय असेल ते आत्ताच जगायला हवे, उदयाचे कोणाला माहित ?
तुमची बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा आत्ताच प्रयत्न करायला हवा. आवडत्या गोष्टी करा, आवडता पदार्थ खावासा वाटतो तर खुशाल खा. फॅमिली ट्रिप काढा, आवडती वस्तू विकत घ्या, नसेल जमेत तर जवळच्या व्यक्तीला तरी बोलून दाखवत जा, कोणास ठाऊक ती वस्तू तुम्हाला ध्यानीमनी नसताना गिफ्ट स्वरूपातही मिळून जाईल. आवडता छंद जोपासा. बऱ्याच वेळा लोकांची ओरड असते की पैसेच नसतात मग कोठून हौस करणार? तुम्ही मनात आणले तर स्वतः साठी, फॅमिली साठी वर्षातून, सहा महिन्यातून एखादा उनाड दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच येऊ शकतो, पण आपण तसें प्लॅनिंगच करत नाही.
आपली मानसिक तयारी असेल तर ती गोष्ट घडून येतेच. काही लोकं खुपच अरसिक असतात त्यांना काम सोडून दुसरे काहीच आवडतच नाही. ते कुटुंबासाठी फक्त पैसे कमवायचे मशीन बनलेले असतात. काबाड कष्टाच्या नादात ते कुटुंबियांच्या सहवासातील अमूल्य क्षण गमावत असतात. बऱ्याच वेळेला त्यांचे म्हणणे असतें की मुलांसाठीच तर करतो आपण, पण मुलांना लहान वयात पैसा, प्रॉपर्टी पेक्षा आई, वडिलांचे प्रेम हवे असतें. ती मोठी झाल्यावर त्यांनाही तुमच्या साठी वेळ नसतो ते करियर, नोकरी, व्यवसाय, यात बिझी झालेले असतात. नोकरी निमित्ताने त्यांना दुसऱ्या शहरात रहावे लागते आणि मग आपल्याला खरी किंमत कळते, पैसा मोठा की सहवास आणि प्रेम मोठे?
बऱ्याच वेळा आपली जवळची प्रेमाची माणसं आपल्यापाशी काहीतरी इच्छा व्यक्त करतात पण आपण अशीच वेळ मारून नेतो किंवा काही अडचणीमुळे पुढे ढकलत असतो. एक दिवस असा येतो की ती व्यक्ती मृत्यू पावते, आपल्यातून कायमची निघून जाते आणि मग आपण एकदम जागे होतो. त्यांची इच्छा अपुरी राहिलेली असतें आणि आपल्या मनात कायम अपराधी भावना राहते. त्यावेळेस असे वाटते, त्यांची इच्छा पूर्ण करणे आपल्याला सहज शक्य झाले असतें पण आपण का दुर्लक्ष केले? म्हणून प्रियजणांची काही इच्छा असेल आणि जर ती शक्य असेल तर वेळीच पूर्ण करायला हवी. उद्या ते असतील, नसतील, कोणास ठाऊक कोण कधी एक्झिट घेईल?
काही लोकं घरात छान सुंदर सोफा विकत घेतात आणि त्यावर बेडशीट, किंवा चादर टाकून ठेवतात कारण काय तर सोफा खराब होतो आता काय म्हणायचं या मानसिकतेला..!! सोफा आपल्यासाठी आहे की आपण सोफ्यासाठी हेच कळत नाही. शोकेसच्या कपाटात कधी न वापरलेली वर्षानुवर्षे ठेवलेली सुंदर खेळणी आणि सुंदर नक्षीची भांडी, नवीन टीव्हीच्या स्क्रीन वरचा कित्येक महिने न काढलेला प्लास्टिकचा कागद, गावाला गेल्यावर घरातील सोने आणि रोकड रकमेच्या काळजीने वाटणारी बेचैनी, कुटुंबासोबत एखाद्या रम्य ठिकाणी सुट्टीला गेल्यावर तेथून सतत फोन करून हाताखालच्या माणसांना सूचना देत रहाणे, ही सगळी एकाच मानसिकतेची उदाहरणे आहेत. या असल्या छोटया छोटया गोष्टींमुळे आपण आनंद गमावून बसतो.
काबाड कष्ट करता करता थोडा फार आयुष्याचा पण आस्वाद घ्यायला हवा. अगदीच उधळपट्टी नको आणि फार कंजूषपणाही नको, कोठेतरी या दोन्हीचा सुवर्णमध्य साधायला हवा. मुलांनाही कमवायला काही तरी शिल्लक ठेवायला नको का? त्यांनाही दुनियादारी कळू देत. त्यांनाही भरारी घेण्यासाठी मोकळं आकाश नको का? थोडक्यात सांगायचे म्हणजे.. उद्याच्या सुखासाठी आजच्या सुखाचा बळी घेऊ नका, आजच भरभरून जगा..