जन्मतःच साडेसाती | Sadesathi


एखाद्या बालकाचा जन्म होतानाच जर त्याच्या राशीत किंवा राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीत शनी असेल तर त्याला जन्मतःच साडेसाती (sadesathi)आहे असे म्हणतात. अशा बालकाचा जन्म होताना प्रसूती काळात मातेला त्रास होतो किंवा काही अडचणी उद्भवतात. जन्मतःच साडेसाती असलेल्या बालकांना बऱ्याच वेळा मातृ सुखाला परके व्हावे लागते किंवा अशा बालकांना आई पासून दूर राहण्याचे योगही येतात. काही केसेस मध्ये बालपणी आईचा मृत्यू होतो.

आई आहे पण काही कारणांमुळे आईपासून दूर राहण्याचे योग येतात म्हणजे मामा, आजोबा, आत्या, काका अशा नातेवाईकांकडे राहावे लागते. शिक्षणासाठी दूर रहावे लागते, दत्तक जावे लागते, कधी कधी आईच्या आजारपणामुळे आईजवळ असूनही सुख नसते. कुंडलीत जर अजून काही अशुभ ग्रहांचा योग असेल तर जन्मतःच आईकडून नाकारले जाणे, अनाथ आश्रमात रवानगी होणे असे प्रकार सुद्धा पाहावयास मिळतात.

जन्मतःच साडेसाती असलेल्या मुलांना लहानपणापासूनच त्रास भोगावा लागतो. मानसिक त्रास, गरिबी, आजारपण असे काहीतरी वाट्याला येतेच. अशी मुलं शाळेत जरी हुशार असली तरी ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, अपघात होणे, परीक्षेला काही कारणाने उशिरा पोहोचणे, घरातल्या कुणाचा तरी मृत्यू होणे असेही प्रकार घडतात. अशी मुलं जर वर्गात हुशार असतील तर वर्ष भर चांगला परफॉर्मन्स दाखवतील, साध्या सुध्या परीक्षेत चांगले यश मिळवतील पण महत्वाच्या, ऐन मोक्याच्या परीक्षेत मागे पडतात आणि त्यांच्या मागचे विद्यार्थी पुढे निघून जातात.

त्या वेळेस सगळ्यांना असा प्रश्न पडतो की हे असे कसे झाले? एवढा हुशार विद्यार्थी मागे कसा पडला? अशा वेळेस त्यांना बोलून काही उपयोग नसतो कारण ते मुद्दाम तसें करत नसतात. अशी मुलं जर क्रिकेट खेळाडू असली तर अगदी अर्धे शतक किंवा पूर्ण शतक व्हायला थोड्या धावा बाकी असतानाच हे आऊट होतात. हे जरी नेहमी होत नसले तरी बऱ्याचदा असे होऊ होते. अशाप्रकारे यश त्यांना बऱ्याचदा हुलकावणी देत असते.

जन्मतःच साडेसाती असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी गरिबी येतेच,आर्थिक अडचणीशी त्यांना कधी ना कधी तरी सामना करावा लागतोच मग भलेही ते श्रीमंत घरातले सदस्य का असेनात. आयुष्यात अनेक धक्के खाल्ल्यामुळे, चढ उतार पहिल्यामुळे, अनेक अपयश पचविल्यामुळे अशी माणसं खंबीर बनलेली असतात. यांनी प्लॅन बी चा कायम विचार केलेला असतो कारण नशीब कधी हुलकावणी देईल हे सांगता येत नाही किंवा जर अपयश आलेच तर ते पचवायची तयारी त्यांनी आधीच केलेली असतें.

अशा माणसांनी जास्त कलाकुसरीची, ॲक्युरेसीची कामे करू नये असे मला वाटते. जसा एखादा मूर्तिकार दगडातून संपूर्ण मूर्ती घडवतो आणि शेवटच्या क्षणी चुकून छन्नीने मूर्तिचे नाक तुटावे परिणामी सगळे परिश्रम पाण्यात जातात. किंवा चिखलाची मूर्ती बनवून तयार आहे, रंग रंगोटी झालेली आहे आणि चुकून मूर्तीला धक्का लागतो आणि मूर्ती खाली पडते फुटते. अशा प्रकारे वेळ आणि पैसा वाया जातो शिवाय मानसिक त्रास होतो तो वेगळाच. एखाद्या कारखान्यात फायनलला आलेला जॉब असतो, त्यावर बरीच ऑपरेशन्स झालेली असतात, शेवटचे ऑपेरेशन राहिलेले असते अशा वेळेस काहीतरी चुकीचे घडून त्या जॉब ची वाट लागते आणि या माणसाला मानसिक त्रास सहन करावा लागतो, परिणामी बोलणी खावी लागतात.

काही लोकांचे प्रमोशन हुकले जाते . जन्मतःच साडेसाती असलेल्या व्यक्तीने व्यवसाय निवडताना सुद्धा आपल्या शिवाय पान ढळत नाही किंवा आपणच व्यवसायातली खूप महत्त्वाची व्यक्ती ( Key Person ) आहे असले व्यवसाय टाळावे. आपण नसतानाही व्यवसाय चालेल असाच व्यवसाय निवडावा. या लोकांच्या आयुष्यात कायमच चढउतार असतात. कधी कोणती परिस्थिती आणि प्रसंग उभे ठाकतील हे सांगता येत नाही. या गोष्टी कायमच घडतील असं नाही, पण त्यांचे प्रमाण यांच्या जीवनात जरा जास्तच असते.

नवीन व्यवसाय सुरू करताना जर आपण व्यवसायात अपयशी झालो तर काय? त्यासाठी प्लॅन बी यांनी कायम तयार ठेवावा, यशाला कधीही गृहीत धरून चालू नये. अशी माणसं शून्यातून जर प्रगतीपथावर गेली तर यांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. अशी लोकं गुरु, मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून उत्तम असू शकतात कारण जन्मतःच साडेसातीमुळे यांनी खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात तसेच अनेक धक्के सहन केल्यामुळे यांच्यात कमालीची सहनशीलता आणि नम्रताही आलेली असतें. अशी लोकं कधी उतावळी नसतात, यशाची पूर्णपणे खात्री पटल्याशिवाय ते कधीही यश साजरे करणार नाहीत कारण त्यांना पक्के माहित असतें की अगदी शेवटच्या क्षणीही डाव पलटू शकतो किंवा तोंडात आलेला घास जाऊ शकतो. अशा व्यक्ती आपल्या व्यवसायात, जीवनात, नोकरीत प्रगती करतात पण त्रास सहन करावा लागतोच. अशी माणसं परिस्थितीला पुरून उरलेली असतात. हार न मानणारे हे योद्धे असतात…