कामानिमित्त मला Glen Innes या ऑस्ट्रेलियातल्या एका छोट्या शहरात राहण्याचा योग आला . जेमतेम पाच हजार लोक वस्ती असलेलं एक थोडंसं प्रगत आणि सुंदर खेडेगाव, सिडनी पासून 650 किलोमीटर वर आहे. पर्यटन आणि शेती हीच उत्पन्नाची दोन मुख्य साधने आणि छोटे मोठे व्यवसाय आहेत. इंटरनेटच्या कामानिमित्त तेथील एका व्यक्तीच्या घरी जाण्याचा योग आला. ब्रेट विल्सन नावाचा तो मधुमक्षिका Beekeeping पालन करणारा एक शेतकरी ( Bee Kipper ) आहे .
सुरवातीला ब्रेट एका कंपनीत 20 वर्ष सेल्समन म्हणून काम करत होता परंतु हा व्यवसाय चालू केला आणि उद्योजक झाला. सुरवातीला YouTube, website, videos या माध्यमातून आणि काही जवळच्या शेतकऱ्यांकडून तो या व्यवसायाबद्दल बरेच काही शिकला. नवीन पेट्या विकत आणायच्या जुन्या पेटीतल्या काही मधमाश्या नवीन पेटीत टाकायच्या, असे करून तो हळू हळू पेट्या वाढवत गेला. एका पेटीपासून सुरु केलेला हा व्यवसाय 8 वर्षांत 300 पेट्यापर्यंत पोहोचला आहे. एका पंधरवाड्यात तो 3 टन मध उत्पादन करतो आणि मोठ्या बॅरल मध्ये भरून तो एका मोठ्या कंपनीला पाठवतो.
कंपनी त्याच्याकडून 5 ते 6 डॉलर किलो या होलेसेल भावाने सर्व माल खरेदी करते तर किरकोळ विक्री तो $10 किलो ने करतो. स्वतःची थोडी फार शेती आहे पण तो या सर्व पेट्या आसपासच्या परिसरात जेथे कॅनोला, मॅकॅडमीया, सूर्यफूल, ई. अशी पिके असतील त्या शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन ठेवतो. या पेट्या वाहून नेण्यासाठी त्याच्याकडे स्वतःचा ट्रक आहे. पेट्या शेतात ठेऊन देण्याच्या बदल्यात तो शेतकऱ्याला वर्षभरात 5 किलो मध देतो आणि मधमाशांमुळे परागीकरण चांगले होऊन पीक चांगले येते म्हणून शेतकऱ्याला फायदा होतो. हिवाळ्यामध्ये मध उत्पादन खुप कमी असतें म्हणजे अगदी चार महिन्यात एखादा टन मध मिळतो, पण इतर काही महिने खुप चांगले उत्पादन होते.
ब्रेट हे सगळे एकटा करतो आणि सुट्टी च्या दिवशी त्याचा तेरा वर्षाचा मुलगा टॉम त्याला मदत करत असतो. मध काढल्यानंतर उरलेले मेण तो सौंदर्यप्रसाधनं आणि मेणबत्ती उत्पादकांना विकतो, म्हणजे वाया काहीच जात नाही. उत्पादन खर्च कमी असलेला हा एक किफायतिशीर धंदा आहे. कधी कधी तो 100 ते 200 किलोमीटरवर जाऊनही शेतामधे पेट्या ठेवतो.पेट्या चोरी जाणे वैगरे हे प्रकार खेडेगावात घडत नाही, आणि परका माणूस कशाला मधमाशांच्या नादी लागतोय.. तो म्हणाला नर आणि राणी माशी डंख मारत नाही फक्त कामकरी मधमाशाच डंख मारतात पण जंगली माशां पेक्षा या माशा थोड्या कमी आक्रमक असतात कारण त्या माणसाळलेल्या असतात.
मध गोळा करण्यासाठी त्या मधमाशा पाच किलोमीटर पर्यंत प्रवास करतात. कधी कधी मोकळा वेळ असेल तर तो इतर शेतकऱ्यांनाही ( Bee Kippers ) मदत करायला जातो . त्याने सांगितले या गावामधे 9000 पेट्या असलेला एक व्यवसायिक आहे, तो पंधरवड्यात 90 ते 100 टन मध उत्पादन काढतो आणि हे सगळं करायला 9 कामगार ठेवले आहेत. असा हा व्यवसाय कमी खर्चाचा, उत्पादक आणि शेतकरी या दोघांनाही फायदेशीर ठरतो. जगात कोठेही जा शेतकरी हा उदार मनाचा असतो. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला सहसा तो मोकळ्या हाताने कधी जाऊ देत नाही. नको नको म्हणता 1 किलो मध त्याने मला दिलाच. पैसे देतो म्हटले तर तो घेईना..आज तो खुप समाधानी आहे. पुढे मुलाला जर हा व्यवसाय आवडला तर तो तसाच त्याच्याकडे सुपूर्द करण्याचा त्याचा मानस आहे.