माणसाच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब Thought reflection त्याच्या कृतीतून दिसून येते हे आपण दैनंदिन जीवनात नेहमीच पाहत असतो किंवा आपल्याला ते अनुभवायला मिळते घराच्या छता मधून आलेली एक उन्हाची तिरिप किंवा बंद खिडकीतून आलेल्या सूर्याच्या एका किरणावरून आपल्याला समजते की बाहेर सूर्य उगवलेला आहे, तसेच एखाद्याची एक सवय, किंवा लकब माणसाचा खरा स्वभाव सांगून जाते . एखाद्याचा स्वभाव माहित होणे हे व्यवहारिक दृष्ट्या बऱ्याचदा फायदेशीर ठरते कारण पुढील नुकसानिपासून पासून सतर्क राहता येते. एका आठवड्यात परत देतो म्हणून उसने पैसे घेऊन गेलेला माणूस जर अनेक महिने पैसे देत नसेल तर अशी माणसं अव्यवहारिक आणि शब्दाला न जागणारी असतात. प्रामाणिक माणसांना अडचणीमुळे देणे शक्य नसेल तर तें तसें अनेकदा सांगतील.
- एखादी व्यक्ती जर तुमच्याशी बोलताना दुसऱ्याची निंदा करत असेल, नावे ठेवत असतील, तर समजून जा वेळ आल्यावर तुमच्या बद्दल पण तें दुसरीकडे बोलणारच .
- कामाच्या टेबलवर अस्ताव्यस्त पडलेली कागद पत्रे, फायली, पेन, सांगतात की हा माणूस त्याचे घर, कार, बेडरूम, कपड्यांचे कपाटही असेच ठेवत असणार .
- कामावर नेहमी गैरहजर राहणारी मंडळी शाळेत असतांना सुद्धा खुप दांड्या मारत असणार आणि नियमित कामावर येणारी माणसं शालेय जीवनात पण शाळा कधी चुकवत नसतील, कारण तो अनेक वर्षांच्या सवयीचा परिणाम असतो.
- वेळेवर दाढी करणारी, चपला बूट वेळेवर पॉलिश करून घेणारी , कपड्यांना वेळेवर इस्त्री करणारी माणसं आपली कामे सुद्धा वेळेवर करण्यास भर देणारी असतात. अशा माणसांवर जबाबदारीची कामे दिली तर ती वेळेवर पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो.
- पाच मिनिटात येतो म्हणून न कळविता तास, दोन तासांनी हजर होणारी माणसं बेपर्वा आणि बेजबाबदार असतात. अश्या व्यक्ती कामाच्या बाबतीत जरा बेभरवाशीच असतात. त्यांच्यावर जबाबदारीची कामे देणे म्हणजे थोडे धोकादायकच असते.
- मिस कॉल पाहूनही वेळ भेटल्यावर फोन न करणारी व्यक्ती तुमची कदर न करणारी किंवा बेफिकीर असतें.
- खरा पुस्तक प्रेमी, पुस्तक किती दर्जेदार आहे हे अनुक्रमणिका पाहूनच अंदाज लावू शकतो.
- एकदा एक गोष्ट सांगिल्यानंतर परत तीच गोष्ट सांगताना जर शब्दांत बदल जाणवत असेल तर असे समजा की समोरची व्यक्ती खोटं बोलतेय किंवा अर्ध सत्य सांगतेय.
- चपला, बूट, कपडे, पार जीर्ण झाले तरी वापरणारी व्यक्ती एक तर काटकसरी असतें किंवा गरिबीतून वर आलेली असतें.
- दुसऱ्याला धोका देणारी माणसं, वेळ आल्यावर तुम्हालाही धोका देणार किंबहुना त्यांच्या सख्या भावालाही धोका देऊ शकतात कारण ती एक प्रवृत्ती असते, कधीही डोकं वर काढू शकते.
- हल्ली व्हाट्सअपच्या स्टेटस वरून पण कळते की समोरच्या व्यक्तीची मानसिकता काय आहे. आंनदी, दुःखी, धार्मिक, खाण्याची आवड, व्यवसायिक, राजकारणाची आवड की प्रेमभंग झालाय हे सगळे स्टेटस वरूनच कळतें कारण मनातले विचार प्रत्यक्षात कृतीत उतरत असतात.
- तुम्ही घेतलेली नवीन गाडी, घर, नवीन सुरु केलेला व्यवसाय किंवा कोणत्याही यशाबद्दल जर जवळच्या व्यक्तीला आनंद होत नसेल, तें आनंदात सहभागी होत नसतील, किंवा उलट टोमणे मारत असतील तर समजून जा की त्यांना तुमची बरोबरी करता येत नाही म्हणून तें मत्सर करतात किंवा आपल्याकडे या गोष्टी का नाहीत म्हणून तें दुःखी असतात.
अशा अनेक छोटया गोष्टींवरून माणसाच्या खऱ्या स्वभावाचा, सवयीचा अंदाज लावता येतो. तुमच्या आसपास अशी अनेक माणसं असतील किंवा अनोळखी माणसं बाहेरच्या जगात भेटत असतात त्यांचे बारीक निरीक्षण केले असता त्यांच्या छोट्याश्या सवयी तुम्हांला बरेच काही सांगून जातील. पाण्याबाहेर तरंगणाऱ्या हिमनगाच्या छोट्याशा टोकावरून आपण अंदाज लावू शकतो की आतमध्ये खुप मोठा बर्फ असावा तसेच छोटी सवय, कृती यांवरून माणसाच्या खऱ्या स्वभावाचा वेध घेता येतो आणि तें बऱ्याच वेळेला दैनंदिन जीवनात खूप फायदेशीर ठरते.