What’s in a name ? नावात काय आहे हे आपण आत्तापर्यंत बऱ्याच वेळा ऐकत आलेलो आहे . एखादा व्यवसाय, प्रॉडक्ट, पुस्तक, चित्रपट किंवा जन्मलेले लहान मुल यांना आपण एखादं नाव देतो तेव्हा ते नाव सुरवातीला अगदी सामान्यच असतें . त्या नावाला ना कसली प्रसिद्धी असते ना कसले वलयं असतें. पुढे जाऊन त्या नावाने काय दिवे लागतील हे कोणालाच माहित नसते, पण त्या वस्तूचा दर्जा, त्याची उपयोगिता किंवा त्या व्यक्तीचे कर्तृत्व त्याला नावारूपास आणते आणि मग एक ब्रँड तयार होतो.
त्या विशिष्ट नावासाठी किंवा ब्रँडसाठी लोकं पार दिवानी होतात. साधं ऍप्पल कंपनीचे उदाहारण आपल्या समोर आहे. Apple हें अमेरिकेतले सर्वसामान्य फळ आहे. जेव्हा स्टिव्ह जॉब्स ने हें नाव कंपनीला दिले असेल तेव्हा लोकं हसली असतील जसे की महाराष्ट्रात एखाद्या कंपनीला आंबा हें नाव दिल्यावर हसतील….. लोकं त्यावेळेस कदाचित म्हटलेही असतील अरे. असे कोठे नाव असतें का ? पण ऍप्पल कंपनीने स्वतःच्या गुणवत्तेने हें सिद्ध केले की नावात काय नसतं. नाव काहीही असू दया ते फक्त सिद्ध करता आले पाहिजे.
आज जगभरातील लोकांना Apple हें नाव पूर्णपने पचनी पडले आहे. या कंपनीने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्याकडे सैराट चित्रपट आला होता तेव्हा ते नावही लोकांना खूप नवखे वाटत होते, इतके की.सैराटचा अर्थ काय आहे हे ही कित्येकांना माहित नव्हते. जसा जसा हा चित्रपट गाजत गेला तसें तसें हें नाव लोकांना आवडू लागले. म्हणजे नावात काय नसते, गुणवत्ता महत्वाची असतें.. दक्षिणेकडचा पुष्पा चित्रपट आला तेव्हाहीं असेच वाटले होते, पुष्पा हें मुलींचे नाव दिलेला चित्रपट आहे आणि पोस्टर तर हिरोचे होते .
नावात काही दम वाटत नव्हता, चालेल की नाही शंका होती पण त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला कारण नाव महत्वाचे नसून आत मध्ये काय मसाला भरलाय हें खूप महत्वाचे आहे. Black berry हें फळाचं नाव पण ते मोबाईलला दिले आणि प्रसिद्ध झाले Amazon हें दक्षिण अमेरिकेतल्या जंगल आणि नदीचे नाव आहे पण ते मार्केटींग कंपनीला दिले आणि प्रसिद्ध झालेच की जे सुरवातीला काहीच विशेष वाटले नसावे. कदाचित ती कंपनी चालेल की नाही हे पण कोणी छातीठोकपणे सांगू शकत नव्हते.
मद्रास चे नाव चेन्नई झाले तेव्हा चेन्नई हे नाव खूपच विचित्र वाटत होते मद्रास एवढे सोपे नाव असताना कशाला हें दुसरे नाव दिले..? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तसेच बंगलोर चे बंगळूरू झाले तेव्हा ही असेच वाटले असावे, पण आता हीं नावे लोकांना आवडू लागली आहेत. ओला, उबर ,स्विगी, झोमॅटो हीं काय नावं आहेत का? पण आता ती प्रसिद्ध झाली आहेत…..मार्केटमध्ये त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
नाव काहीही असू देत नावात काय नसते. नाव हे स्वकर्तुत्वाने मोठे होत असतें हे तितकेच खरे.
नावात काय आहे? या वाक्यालाही दुसरी बाजू आहे. आणि ती आपल्याला भारतीय जीवनशैलीत प्रकर्षाने जाणवते. नाव म्हणजे पण खूप काही असतें, नावातहीं खूप दम असतो, नामांतरावरून राजकारण पेटते. एखाद्या कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव छापले नाही किंवा कार्यक्रमात नाव पुकारले नाही म्हणून लोकं नाराज होतात. चौकात आपल्या नावाचे बॅनर लागावे म्हणून काहीजण धडपडतात.
तसें पहिले तर त्या सर्वसामान्य माणसाच्या नावाला एवढे मोठे वलय किंवा प्रसिद्धी नसते परंतु परिणाम तर पहायला मिळतोच ना. काही लोकांना आई वडिलांनी किंवा आज्जी आजोबांनी ठेवलेली नावे आवडत नाही कारण त्यांना ती नावे गावंढळ वाटतात म्हणून ते स्वतःची नावे बदलून घेतात. काही आडनावे पण इतकी विचित्र असतात की लोकांना सांगायलाहीं लाज वाटते. म्हणजे नावाला किंमत असतें हें आपल्याकडे तरी नक्कीच.खरे आहे.
पुंडलिक, लक्ष्मण, मारुती, रखुमाई, बाजीराव, संभाजी या नावांना इतिहासात खूप प्रसिद्धी आहे आणि लोकं ती आवडीने ठेवत असत.. तरी पण आज लोकांना हीं नावे नको वाटतात. त्याऐवजी प्रतीक, आशिष, अक्षय अवंतिका, अक्षदा, अशी आधुनिक नावे ठेवली जातात. या नावांमध्ये असे विशेष काही नाही पण आजकाल ती आवडीने ठेवली जातात, म्हणजेच नावाला महत्व आहे हें नक्की खरे आहे.
लहानपणी पप्पू, पिंट्या, पिंटी, बबडी, चिकू, बाबू, बंडया हीं नावे मुलांना आवडतात पण तीच मुले जेव्हा मोठी होतात, नोकरीला लागतात, त्यांची लग्न होतात, त्यांनाहीं मुलं होतात तेव्हा मात्र हीं स्वतःचीच गोंडस नावं त्यांना त्रासदायक ठरू लागतात. जसं जसं वय वाढत जाते तशी या गोंडस नावांची अडचण वाटू लागते.
शाळा,कॉलेज किंवा गल्ली मध्ये एखाद्याला पाडलेले टोपण नाव सुद्धा बऱ्याच वेळा भांडणावर येते .
आडनावावरून किंवा नावावरून सुद्धा हा व्यक्ती कोणत्या जाती धर्माचा असावा याचा अंदाज बांधू आपण शकतो. म्हणजे नावाचा केवढा मोठा परिणाम आपल्या जीवनावर होतो हें पाहायला मिळते. येथे नावात काय आहे? असे म्हणून चालत नाही. नावाने बरेच काही चालते हें हीं तितकेच खरे आहे. विल्यम शेक्सपियरचे प्रसिद्ध वाक्य What’s in a name? हें जरी खरे असले तरी आपल्याकडे मात्र ते शंभर टक्के काम करतांना दिसत नाही,हे ही तितकेच खरे.